उन्हाळ्याला पावसाची सलामी
By admin | Published: March 2, 2015 01:21 AM2015-03-02T01:21:31+5:302015-03-02T01:21:45+5:30
पणजी : उन्हाळा उंबरठ्यावर असताना दमदार पावसाने गोव्याला रविवारी पहाटे तीनच्या सुमारास झोडपले. रविवारी दोन इंच पावसाची नोंद झाली.
पणजी : उन्हाळा उंबरठ्यावर असताना दमदार पावसाने गोव्याला रविवारी पहाटे तीनच्या सुमारास झोडपले. रविवारी दोन इंच पावसाची नोंद झाली. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतीय किनारपट्टीत चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण होऊन पाऊस कोसळला.
अरबी समुद्रात अचानक झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातलगतच्या भारतीय किनारपट्टी भागात शनिवारी सायंकाळी तापमानात वाढ होऊ लागली तेव्हाच पावसाचे संकेत मिळू लागले होते. समुद्रावरून पावसासह जोरदार वारा किनारपट्टीच्या दिशेने येण्याची शक्यता असल्यामुळे हवामान खात्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशाराही दिला होता. रविवारी पहाटे तीनपासून सहा वाजेपर्यंत पाऊस पडला. रविवारी दिवसभरही अधून मधून हलक्या सरी पडत होत्या. दुपारी तीन वाजल्यानंतरही अनेक ठिकाणी पुन्हा पाऊस पडला.
भारतीय किनारपट्टीलगतच्या प्रदेशात रविवार आणि सोमवारीही पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. इन्सेट ३ डी आणि कल्पना १ उपग्रहानुसार प्राप्त छायाचित्रांत गोवा,
महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानसह संपूर्ण पश्चिम किनारपट्टी भागात, मध्य-उत्तर भारत तसेच इशान्येकडील भागात पावसाचे ढग जमले आहेत. ही छायाचित्रे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटवर प्रसिद्धही केली आहेत.
ऋतुचक्रानुसार १ मार्च या दिवशी उन्हाळा सुरू होतो. उन्हाळा सुरू व्हायला एक दिवस
असताना हवामानात अचानक बदल झाल्याने हा पाऊस कोसळला. (प्रतिनिधी)