कामत, नरेंद्र की कवळेकर? दक्षिण गोव्याच्या तिकिटासाठी राजीव चंद्रशेखर करणार चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 08:01 AM2024-01-04T08:01:44+5:302024-01-04T08:04:07+5:30

भाजपचे आज चिंतन : मंत्री, आमदार, पदाधिकारी म्हापशात

rajeev chandrasekhar to meet for south goa candidate lok sabha election 2024 | कामत, नरेंद्र की कवळेकर? दक्षिण गोव्याच्या तिकिटासाठी राजीव चंद्रशेखर करणार चाचपणी

कामत, नरेंद्र की कवळेकर? दक्षिण गोव्याच्या तिकिटासाठी राजीव चंद्रशेखर करणार चाचपणी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार, मंत्री, पदाधिकारी यांचे चिंतन शिबिर आज, गुरुवारी दुपारी ४ वाजता म्हापसा येथे होणार आहे. दक्षिण गोवा मतदारसंघाचे लोकसभा निवडणूक प्रभारी केंद्रीय आयटीमंत्री राजीव चंद्रशेखर हे आजच गोव्यात दाखल होत आहेत. ते चिंतन शिबिराला उपस्थित नसतील. पण दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून दिगंबर कामत, नरेंद्र सावईकर की बाबू कवळेकर यांना तिकीट द्यावे याविषयी चंद्रशेखर हे आपल्या गोवा भेटीवेळी प्राथमिक चाचपणी करून जातील, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या रणनीतीवर या शिबिरात चिंतन होणार आहे. पक्ष जो कोणी उमेदवार देईल त्याला अधिकाधिक मतांनी निवडण्यासाठी काय करता येईल याबाबत धोरणावर चर्चा होईल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पक्षाच्या कोअर कमिटीवरील सदस्यही आपली मते मांडतील. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघांमध्ये भाजपला अवघ्या काही मतांनी पराभव पत्करावा लागला त्या मतदारसंघांवर पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. काही जणांवर जबाबदारीही दिली आहे. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अॅड. नरेंद्र सावईकर यांना ९ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला होता. या मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय आयटीमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडे देण्यात आली आलेली आहे. याआधी ते गोव्यात येऊन दक्षिणेतील निम्म्याहून अधिक विधानसभा मतदारसंघांचा दौरा करून गेले होते. भाजपकडून शेवटी सर्वेक्षण करण्यात येते व त्या आधारे उमेदवार निश्चित केला जातो.

माजी मुख्यमंत्री कामत, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर तसेच सरचिटणीस दामू नाईक हेही तिकिटाचे दावेदार मानले जातात. दक्षिणेतील आमदारांना याविषयी काय वाटते हे चंद्रशेखर जाणून घेतील. राजीव चंद्रशेखर यांनी दक्षिणेतील निम्म्याहून अधिक विधानसभा मतदारसंघांचा दौरा केला आहे. तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यात चंद्रशेखर हे कुडचडे, नुवे, दाबोळी व सांगे या चार मतदारसंघांचा दौरा करणार असून प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. म्हापशातील चिंतन शिबिरात सहभागी होण्याआधी चंद्रशेखर हे मडगाव येथे रवींद्र भवनमध्ये गोव्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ करतील.

बाबू कवळेकरांना डावलण्याचा प्रयत्न?

बाबू कवळेकर हे भाजपच्या तिकिटासाठी इच्छुक असल्याने त्यांना पक्ष कार्यक्रमांमध्ये डावलण्याचा प्रकार काही पदाधिकारी करत असल्याची चर्चा भाजपच्या आतील गोटात पसरली आहे. राज्यात तीन दिवस राजीव चंद्रशेखर यांचा नेमका कार्यक्रम काय असेल, पक्षांतर्गत बैठका कुठे होतील, कुणासोबत होतील वगैरे माहिती भाजपमधीलच काही जणांनी गुप्त ठेवली. विनय तेंडुलकर हे भाजपचे दक्षिण गोया प्रभारी आहेत. त्यांना देखील आदल्या दिवशीच व्हॉट्सअॅपवर माहिती पाठविली गेली. त्यांनाही काही दिवस मुद्दाम अंधारात ठेवले गेले, अशीही चर्चा आहे. मडगाव किया दक्षिण गोव्यात होणाऱ्या पक्षाच्या कार्यक्रमावेळी किंवा बैठकांवेळी कवळेकर यांना मुद्दाम माहिती दिली जात नाही, त्यांना अंधारात ठेवले जाते व ठरावीक पदाधिकारी आपल्यालाच प्रोजेक्ट करून घेतात, अशी चर्चा प्रदेशाध्यक्ष तानावडे यांच्याही कानी पोहोचली असल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले. कवळेकर, तेंडुलकर यांना डावलले जाते याची कल्पना आज किंवा उद्या काही जण राजीव चंद्रशेखर यांनाही देणार आहेत.
 

Web Title: rajeev chandrasekhar to meet for south goa candidate lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.