राजेंद्र आर्लेकर नाहीच; मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे केले जाहीर, प्रमोद सावंत 'टेन्शन फ्री'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2025 07:54 IST2025-01-02T07:53:34+5:302025-01-02T07:54:54+5:30
मुख्यमंत्री आता 'टेंशन फ्री' झाल्याची चर्चा भाजपच्या आतील गोटातही आहेच.

राजेंद्र आर्लेकर नाहीच; मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे केले जाहीर, प्रमोद सावंत 'टेन्शन फ्री'
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राजेंद्र आर्लेकर हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. स्वतः त्यांनीच तसे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रमोद सावंत यांच्या पदाला कोणताही धोका नाही, अशी चर्चा समर्थकांमध्ये सुरू आहे. शिवाय मुख्यमंत्री आता 'टेंशन फ्री' झाल्याची चर्चा भाजपच्या आतील गोटातही आहेच.
राजेंद्र आर्लेकर यांचे नाव संघाच्या महाराष्ट्रातील काही लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पुढे आणले होते. गोव्यात नेतृत्वबदल करून आर्लेकर यांना गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी आणण्याच्या हालचाली एका गटाकडून चालू झाल्या होत्या. पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांना राजीनामा द्यायला लावून रिक्त होणार असलेल्या जागी सहा महिन्यांत राजेंद्र आर्लेकर यांना निवडून आणले जाईल, असा बोलबाला होता. परंतु, याच दरम्यान बिहारहून त्यांची केरळमध्ये राज्यपालपदी बदली झाली. आर्लेकर यांनी आपल्याला हे पद मिळावे म्हणून कोणतेही लॉबिंग केलेले नाही.
केरळच्या राज्यपालपदाचा ताबा घेण्यासाठी काल, बुधवारी ते रवाना झाले. तत्पूर्वी दोनापावला येथे राजभवनवर त्यांनी गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली. यावेळी आर्लेकर म्हणाले की, जसा गोवा माझा आहे तसेच आता केरळही माझे आहे. राज्यपाल बनलो तरी केरळमध्ये मी सरकारला हे करा, ते करा, असे सांगणार नाही. सरकार जे काम करील त्यात मदत करीन. केरळचा आणखी विकास व्हावा हाच माझा नववर्षानिमित्त संकल्प आहे.
यापूर्वी हिमाचल प्रदेश व बिहारमध्ये राज्यपालपदी काम केल्याने तेथील संस्कृती व अनेक गोष्टी शिकता आल्या. हा अनुभव माझ्या गाठीशी आहे. भारत देश फार मोठा आहे व शिकण्यासारखे भरपूर काही आहे. गोव्याचे राज्यपाल पिल्लई हे मूळचे केरळचे व माझे जुने मित्र आहेत. त्यांच्याकडून केरळबद्दल मी जाणून घेतल्याचे आर्लेकर यावेळी म्हणाले.
राज्यपाल पिल्लई यांना भेटून मी केरळविषयी जाणून घेतले. तेथील वातावरण गोव्यासा- रखेच आहे. गोव्यात जसे पर्यटन विकसित झालेले आहे तसेच केरळमध्येही पर्यटनाचा विकास झालेला आहे. तेथील पर्यटन, अर्थव्यवस्था याविषयी मी पिल्लई यांच्याकडून माहिती घेतल्याचे आर्लेकर म्हणाले.
कोणत्याही राजकीय पदाची मला ऑफर नाही
गोव्यात कोणत्याही राजकीय पदाच्या शर्यतीत मी नाही. तशी मला कोणती ऑफरही नाही. या सर्व अफवा आहेत. माझ्याकडे सध्या केरळच्या राज्यपालपदाची जबाबदारी दिलेली आहे व ती मी योग्यरीत्या पार पाडीन, असे आर्लेकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.