बिहारच्या राज्यपालपदी राजेंद्र आर्लेकर; मोठ्या राज्याची जबाबदारी दिल्याबद्दल केंद्राचे मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 12:41 PM2023-02-13T12:41:03+5:302023-02-13T12:41:41+5:30
जुलै २०२१ मध्ये त्यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राजेंद्र आर्लेकर यांची नियुक्ती बिहारच्या राज्यपालपदी करण्यात आली आहे. ते हिमाचल प्रदेशचेही राज्यपाल आहेत. तर महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस यांना आणण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकूण १३ राज्यांतील राज्यपाल बदलले आहेत. यासंबंधीचा आदेश रविवारी काढण्यात आला.
६८ वर्षीय आर्लेकर यांनी गोवा विधानसभेत सभापती तसेच मंत्री म्हणूनही काम केलेले आहे. जुलै २०२१ मध्ये त्यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. जवळजवळ दीड वर्षांनी त्यांच्याकडे आता मोठ्या राज्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रासह एकूण १३ राज्यांमधील राज्यपाल बदलण्यात आले आहेत. त्यामध्ये अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालपदी कैवल्य त्रिविक्रम परनाईक, सिक्कीमच्या राज्यपालपदी लक्ष्मण प्रसाद आचार्य, झारखंडच्या राज्यपालपदी सी.पी. राधाकृष्णन, हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी शिव प्रताप शुक्ला, आसामच्या राज्यपालपदी गुलाब चंद कटारिया, आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी एस. अब्दुल नझीर, छत्तीसगडच्या राज्यपालपदी बिस्वा भूषण हरिचंदन, मणिपूरच्या राज्यपालपदी अनुसुईया उईके, नागालँडच्या राज्यपालपदी एल. गणेशन, मेघालयच्या राज्यपालपदी फागू चौहान, रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तर बी. डी. मिश्रा यांची लडाखच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.
देशासाठी आपले योगदान सुरुच राहील
दरम्यान, नव्या नियुक्तीचे स्वागत करताना आर्लेकर यांनी केंद्राचे आभार मानले आहेत. बिहारमध्ये नियुक्ती करुन मोठ्या राज्याची जबाबदारी दिली. मी केंद्राचा आभारी आहे, असे ते म्हणाले. आपली याआधीची कामगिरी पाहून केंद्राने ही मोठी जबाबदारी सोपवली असावी. देशासाठी आपले योगदान चालूच राहील असे ते म्हणाले. बिहारमध्ये नीतीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली जद (यू) व राजद यांचे संयुक्त सरकार सत्तेवर आहे. बिगर भाजप सरकार असलेल्या राज्यात नियुक्ती केल्याने कसे वाटते? असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, सरकार हे सरकार असते ते कुठल्या पक्षाचे आहे, याबाबत राज्यपालपदावरील व्यक्तीला फरक पडत नाही.'
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"