पर्यटन विकास महामंडळावर पाटणेकर तर एनआरआय आयुक्तपदी गांवकरांची वर्णी लागण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 01:07 PM2018-09-25T13:07:26+5:302018-09-25T13:08:59+5:30
नव्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पर्यटन विकास महामंडळ डिचोलीचे भाजपा आमदार राजेश पाटणेकर यांच्याकडे तर एनआरआय आयुक्तपद सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गांवकर यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.
पणजी - नव्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पर्यटन विकास महामंडळ डिचोलीचे भाजपा आमदार राजेश पाटणेकर यांच्याकडे तर एनआरआय आयुक्तपद सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गांवकर यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.
निलेश काब्राल हे मंत्री झाल्याने आता त्यांच्याकडील पर्यटन महामंडळ अन्य एखाद्या आमदाराकडे द्यावे लागणार आहे. राजेश पाटणेकर हे या महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी फ्रंट रनर असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पाटणेकर यांच्याकडे सध्या हस्तकला महामंडळ आहे. परंतु या महामंडळाच्या अध्यक्षपदावर पाटणेकर समाधानी नाहीत.
प्रसाद गांवकर हे अपक्ष आमदार असून भाजपा आघाडी सरकारसोबत ते पहिल्या दिवसापासून राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना काही ना काही बक्षिसी सरकारला द्यावीच लागणार आहे. गांवकर हे सरकारबरोबर असले तरी काहिसे नाराज आहेत. काल नवे मंत्री मिलिंद नाईक आणि निलेश काब्राल यांच्या राजभवनवरील शपथविधी सोहळ्यास पणजीत असूनही ते गैरहजर राहिले. आपल्याला एखादे वजनदार महामंडळ मिळावे, अशी त्यांची इच्छा आहे. परंतु तूर्त त्यांचे नाव अनिवासी भारतीय आयुक्त (एनआरआय) पदासाठी आघाडीवर आहे.
पाटणेकर यांना पर्यटन महामंडळ दिल्यास हस्तकला महामंडळावर नवा अध्यक्ष नेमावा लागणार आहे. तेथे एखाद्या अन्य आमदाराची वर्णी लागू शकते. आमदार पाटणेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर मौन पाळणे पसंत केले. ते म्हणाले की, ‘ आपल्याला या विषयावर काहीही भाष्य करायचे नाही’.
आमदार प्रसाद गांवकर यांच्याशी संपर्क साधला असता ते सरकारवर नाराज असल्याचे संकेत मिळाले. एनआरआय आयुक्तपदाचा प्रस्ताव आहे का, असे विचारले असता अद्याप तसा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही. आल्यानंतर विचार करु, असे उत्तर त्यांनी दिले. यावर अधिक काही बोलण्याचे त्यांनी टाळले.