गोव्याच्या सभापतीपदी राजेश पाटणेकर निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 12:39 PM2019-06-03T12:39:46+5:302019-06-03T12:41:02+5:30
गोवा विधानसभेचे सभापती म्हणून डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांचे नाव सत्ताधारी भाजपाप्रणीत आघाडीने निश्चित केले आहे.
पणजी - गोवा विधानसभेचे सभापती म्हणून डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांचे नाव सत्ताधारी भाजपाप्रणीत आघाडीने निश्चित केले आहे. पाटणेकर यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात आता प्रथमच सभापती म्हणून काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे.
दोन महिन्यांपूर्वी डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेण्यापूर्वी काही तास अगोदर सभापतीपदाचा राजीनामा दिला. सभापतीपद रिक्त होते. फक्त तात्पुरती व्यवस्था म्हणून उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे सभापतीपदाचा ताबा सोपविला गेला होता. सभापतीपदी आपल्या अत्यंत विश्वासातील व्यक्ती असायला हवी असे मुख्यमंत्री सावंत व भाजपाच्या कोअर टीमला वाटत होते. त्यानुसार सत्ताधारी भाजपाने पाटणेकर यांचे नाव सूचविले. पाटणेकर हे मूळ भारतीय जनता पक्षाचेच आहेत. फक्त एकदा म्हणजे 2011 च्या सुमारास ते भारतीय जनता पक्षाचाव आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये गेले होते. त्यानंतर काँग्रेसच्या तिकीटावर 2012 साली डिचोलीत त्यांचा पराभव झाला. ते पुन्हा भाजपामध्ये आले व 2017 सालच्या निवडणुकीत विजयी झाले. पाटणेकर यांना कधीच मंत्रिपद मिळाले नाही. त्यांनी काही शासकीय महामंडळांचे चेअरमन म्हणून मात्र काम पाहिले आहे.
सभापती निवडण्यासाठी गोवा विधानसभेचे एकदिवसीय अधिवेशन मंगळवारी (4 जून) बोलविण्यात आले आहे. राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी अधिवेशन बोलविण्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. सत्ताधारी भाजपाप्रणीत आघाडीकडे स्पष्ट बहुमत असल्याने सभापतीपदी पाटणेकर यांची निवड होईल हे निश्चित आहे. फक्त निवडीचा सोपस्कार तेवढा मंगळवारी पार पाडला जाईल. सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यास सोमवारी मुदत होती. पाटणेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला.