राजीव चंद्रशेखर यांची ४ मतदारसंघात चाचपणी; लोकसभेच्या अनुषंगाने आमदार, पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 08:03 AM2024-01-03T08:03:07+5:302024-01-03T08:04:34+5:30
विशेष म्हणजे नीलेश काब्राल तसेच त्यांच्या दुखावलेल्या कार्यकत्यांशीही ते बोलणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी असलेले केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री राजीव चंद्रशेखर उद्या, गुरुवारी गोव्यात येत असून, दक्षिणेतील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये ते चाचपणी करणार आहेत. या दौऱ्यात ते प्रमुख कार्यकर्ते, आमदार, मंत्री यांच्याशी चर्चा करणार आहेत. विशेष म्हणजे नीलेश काब्राल तसेच त्यांच्या दुखावलेल्या कार्यकत्यांशीही ते बोलणार आहेत.
कुडचडे, सांगे, दाबोळी व नुवे या विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांचा दौरा निश्चित झालेला आहे. माजी खासदार तथा एनआरआय आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर तसेच माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. चंद्रशेखर हे प्रमुख कार्यकर्ते, आमदारांशी संवाद साधून काही गोष्टी जाणून घेतील.
नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा हे विधानसभेत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. सप्टेंबर २०२२ मध्ये आठ आमदारांसह ते भाजपवासी झाले. त्यांना आता मंत्रिपदही मिळाले आहे. परंतु नुवे हा ख्रिस्तीबहुल मतदारसंघ असल्याने भाजपला तेथे विशेष परिश्रम घ्यावे लागतील. सिक्वेरा यांना मंत्रिपद बहाल केल्यानंतर हा मतदारसंघ भाजपला अनुकूल झाला आहे का? याची चाचपणी ते करतील.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी चंद्रशेखर यांच्या दौऱ्याबाबत दुजोरा दिला आहे. तसेच लोकसभेच्या अनुषंगानेच त्यांचा हा दौरा असल्याचेही त्यांनी सांगितले.
काब्रालांना भेटणार
कुडचडेत नीलेश काब्राल यांना मंत्रिमंडळातून डिच्चू दिल्यानंतर काही कार्यकर्ते दुखावलेले आहेत. काब्राल तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. दाबोळी मतदारसंघ मावीन गुदिन्हो यांचा आहे. गुदिन्हो भाजपच्या तिकिटावर विधानसभेत निवडून आलेले आहेत. या मतदारसंघातही चंद्रशेखर कार्यकर्त्यांकडे बोलून चाचपणी करतील. सांगे मतदारसंघ भाजपचेच सुभाष फळदेसाईकडे आहे.