नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजनाथ सिंग व श्रीपाद नाईकांनी राजीनामा द्यावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 02:02 PM2020-06-20T14:02:12+5:302020-06-20T14:02:46+5:30
गोवा काँग्रेसची मागणी: रक्षा मंत्रालय झोपा काढत असल्याचे सिद्ध
मडगाव : चीनने भारतावर केलेला हल्ला हा पुर्वनियोजीत होता असे वक्तव्य करुन केंद्रीय रक्षा राज्य मंत्री श्रीपाद नाईक यानी केंद्रातील मोदी सरकार व रक्षा मंत्रालय एवढे दिवस झोपा काढत होते हे मान्य केले आहे. या आक्रमणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून रक्षामंत्री राजनाथ सिंह आणि रक्षा राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
भाजपला देशाच्या सुरक्षेचे काहिच पडलेले नसुन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्यक्तीगत प्रसिद्धीचे चोचले पुरवीण्यासाठी भाजप सरकार केवळ स्टंटबाजी करण्यात धन्यता मानत आहे हे आता उघड झाले आहे अशी टीका चोडणकर यांनी केली आहे.
भाजप सरकार सत्तेवर आल्यापासुन केवळ मोदींची व्यक्तिपूजा करण्यात सर्वच्या सर्व केंद्रीय मंत्री व भाजपचे पदाधिकारी गुंतले असुन, विदेश नीतीचे कोणतेही ठोस धोरण आज भाजप सरकारकडे नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
"लाल आंख" दाखवण्याची भाषा करणाऱ्या नरेंद्र मोदींवर आज नेपाळ सारखा छोटा देश डोळे वटारत आहे ही धक्कादायक बाब आहे.
चीनचे अध्यक्ष शी जिनपींग यांच्या बरोबर गुजरातेत झोपाळ्यावर बसुन झुलणे व महाबलीपूरम येथे त्यांच्या बरोबर दाक्षिण्यात वेशभूषा करुन स्वताचे फोटो काढुन प्रसिद्धी मिळवीणे या व्यतिरीक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी कोणतीच पाऊले उचलली नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे असे चोडणकर यांनी म्हटले आहे.
चीनने हल्ल्याची पुर्वतयारी केली होती तर त्याची माहिती भारताला कशी मिळाली नाही हे श्रीपाद नाईक यांनी सांगावे. आज सॅटलायट यंत्रणेने जगाच्या पाठीवर कोठे काय चालले आहे याची इत्यंभूत माहिती मिळू शकते. सरकारला याची जाणीव झाली नाही याचा सरळ अर्थ सरकार मोदींच्या दुसऱ्या पर्वातील वर्षपुर्तीचे सोहळे आयोजित करण्यात व्यग्र होती हे सिद्ध झाले आहे असे ते म्हणाले.
भाजपचे बेगडी देशप्रेम व निवडणुकीसाठी सैन्याचा वापर या जुमल्यांना आता जनता पुर्णपणे ओळखली असुन, भारतीयांच्या देशप्रेमाचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी फायदा करुन घेण्याचा भाजपचा कुटील डाव आता जनतेला कळुन चुकला आहे.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे शोभेचे बाहुले म्हणुन मोदी मंत्रीमंडळात असुन, आज त्यांच्याकडे कसलेच अधिकार नाहीत. आयुर्वेदीक औषधाने इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स चार्लस कोविड आजारातुन बरे झाल्याचा दावा करुन तोंडघशी पडलेल्या उत्तर गोव्याच्या खासदारानी चीन हल्ल्यावर केलेल्या वक्तव्याने गोव्याला लाजेने मान खाली घालायला भाग पाडले आहे अशी टीका चोडणकर यांनी केली आहे.