अवघा गोवा राममय! धार्मिक कार्यक्रम, शोभायात्रा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2024 09:36 AM2024-01-22T09:36:14+5:302024-01-22T09:36:39+5:30
राज्य सरकारने आज सोमवारी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : अयोध्येत आज होणार असलेल्या प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अवघा गोवा राममय झाला आहे. आज दुपारी १२:२० वाजता अयोध्येत मूर्ती प्रतिष्ठापना होईल तेव्हा गोव्यातील मंदिरांमध्येही रामनामाचा जयघोष होईल. मंदिरांमध्ये राम नामाचा जप, महाआरती, भजन, कीर्तन तसेच इतर धार्मिक कार्यक्रम व शोभायात्राही होणार आहेत.
राज्य सरकारने आज सोमवारी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. सर्व शहरे तसेच गाव प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या प्रतिकृती, भगवे रामध्वज, राम पताकांनी सजली आहेत. सर्वत्र सुशोभीकरण, रोषणाई, आकाशकंदील यामुळे दिवाळीचेच वातावरण आहे.
भाजपच्या मंत्री, आमदारांनी गेले तीन-चार दिवस आपापल्या मतदारसंघांत मंदिरांची साफसफाई केली. आज धार्मिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले आहे. अनेक मंदिरांमध्ये दुपारी महाप्रसादही आहे. श्रीराम ज्योती प्रज्वलित करण्याचा शासकीय पातळीवरील प्रमुख कार्यक्रम आज सायंकाळी ६ वाजता पर्वरी येथे एससीईआरटी इमारतीजवळ होणार आहे. पर्यटन खात्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहतील. महाआरती, भजनसंध्या, दिंडी, शास्त्रीय नृत्य व आतषबाजी याप्रसंगी होणार आहे.
दरम्यान, राजधानी शहरात बसस्थानकाजवळ क्रांती सर्कवर प्रभू श्रीरामाचे कटआऊटस तसेच आकर्षक सजावट करून केलेल्या रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कुंभारजुवें, पीर्ण, तिवरे- वरगाव तसेच अन्य ग्रामपंचायतींनी आज आपल्या कार्यक्षेत्रातील मांसाहारी, मटण दुकाने, मद्यालये बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे. सर्व पोलिस स्थानकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ड्यूटीवर येण्यास बचावले भाटे
सुरक्षेसाठी पोलीस तैनात
अयोध्येतील प्राणप्रतीष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी अनेक ठिकाणी सुरक्षेसाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. रविवारी रात्री आणि सोमवारी असे दोन दिवस यंत्रणा सतर्क करण्यात आली आहेत. पोलिस महासंचालक डॉ जसपाल सिंग यांनी यापूर्वीच बंदोबस्त वाढविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. पोलिस निरीक्षक व वरच्या रॅकच्या अधिकाऱ्यांनाही सातत्याने सुरक्षा विषयक देखरेख ठेवण्याचे आदेश मुख्यालयातून देण्यात आले आहेत.
सावर्डेत भव्यदिव्य प्रतिकृती
सावर्डे येथे मोठ्या भिंतीवर श्रीरामाचे चित्र रेखाटले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही यात भाग घेऊन काही भाग रेखाटला. मुख्यमंत्री चित्र रेखाटताना 'जय श्रीराम' नामाचा जयजयकार करण्यात आला. त्यानंतर सावर्डे येथेच प्रदुल सांगेकर याच्या संकल्पनेतून ५० हजार फासे वापरून तयार केलेल्या प्रभू श्रीरामाच्या प्रतिकृतीला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली.