राममनोहर लोहिया व टी. बी. कुन्हांचा पुतळा उभा करा, मगोपचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 09:03 PM2018-02-06T21:03:53+5:302018-02-06T21:05:00+5:30
राज्यात पुतळ्यांचे राजकारण बरेच तापले असून मगो पक्षाच्या केंद्रीय समितीची व मगोपच्या आमदारांची संयुक्त बैठक मंगळवारी येथे झाली व त्यावेळी विधानसभेसमोर स्व. राममनोहर लोहिया व टी. बी. कुन्हा यांचे पुतळे उभे केले जावेत अशा प्रकारची मागणी करणारे ठराव विधानसभेत सादर करावेत असा निर्णय घेण्यात आला.
पणजी : राज्यात पुतळ्यांचे राजकारण बरेच तापले असून मगो पक्षाच्या केंद्रीय समितीची व मगोपच्या आमदारांची संयुक्त बैठक मंगळवारी येथे झाली व त्यावेळी विधानसभेसमोर स्व. राममनोहर लोहिया व टी. बी. कुन्हा यांचे पुतळे उभे केले जावेत अशा प्रकारची मागणी करणारे ठराव विधानसभेत सादर करावेत असा निर्णय घेण्यात आला. मगोपचे सावर्डेचे आमदार दिपक प्रभू पाऊसकर यांच्यातर्फे हा ठराव मांडला जाणार आहे. राज्यातील सर्व राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय रस्त्यांना स्वातंत्र्य सैनिकांची नावे द्यावीत असाही ठराव विधानसभेत मगोतर्फे मांडला जाणार आहे.
पक्षाच्या बैठकीनंतर अध्यक्ष दिपक ढवळीकर व बांधकाम मंत्री असलेले सुदिन ढवळीकर यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. आमदार पाऊसकर तसेच कार्याध्यक्ष नारायण सावंत हेही यावेळी उपस्थित होते. गोवा पोतरुगिजांच्या ताब्यात असताना 18 जून रोजी राममनोहर लोहिया यांनी मडगावला सभा घेऊन क्रांती सुरू केली होती. गोवा मुक्तीच्या लढय़ात त्यांचे आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी टी. बी. कुन्हा यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे विधानसभेसमोर या दोघांचेही पुतळे उभे केले जावेत, अशी मागणी करणारा ठराव मगोपचे आमदार विधानसभेच्या येत्या अधिवेशनात सादर करतील, असे ढवळीकर यांनी सांगितले. ठराव कामकाजात दाखल करून घ्यावा की घेऊ नये किंवा पुतळे कुठे उभे करावेत ते सभापती ठरवतील, असे ढवळीकर म्हणाले.
राज्यातील सर्व रस्त्यांना स्वातंत्र्य सैनिकांची नावे द्यावीत आणि हायस्कुलमध्ये व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्तरावर योगाविषयक अभ्यासक्रम लागू केला जावा अशी मागणी करणारेही ठराव विधानसभेत मगोपचे आमदार प्रभू पाऊसकर हे मांडतील. त्याबाबतची नोटीस त्यांनी विधिमंडळ खात्याला सादर केली आहे. स्व. ज्ॉक सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ाबाबतचा ठराव जर विधानसभेत आला तर तिथे कोणती भूमिका घ्यावी ते पक्षाचे तिन्ही आमदार मिळून विधानसभेत ठरवतील असेही ढवळीकर म्हणाले.
गोंयकारपणाचे राजकारण : सुदिन
आम्ही भारतीय प्रथम व मग गोमंतकीय आहोत. गोव्याची लोकसंख्या सोळा लाख असून हे सगळे सोळा लाख लोक गोमंतकीय आहेत. उगाच कुणी गोमंतकीय व बाहेरचे असा भेदभाव करून फुट पाडू नये. काही राजकारणी सध्या गोंयकारपणाचे राजकारण करत आहेत. मतांसाठी पुतळ्य़ांचे राजकारण केले जात आहे. हे लोक नेते कधी झाले व त्यांनी गोव्यासाठी नेमके योगदान तरी काय व कधी दिले आहे असा प्रश्न सुदिन व दिपक ढवळीकर यांनी गोवा फॉरवर्डच्या नेत्यांचे नाव न घेता केले. नसते वाद न घालता लोकांना आम्ही सर्वानी काम करून दाखवायला हवे. सरकार चांगले चालत असून आपल्या ताब्यातील आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडील खात्यांचे काम सध्या गोवाभर सुरू आहे, असे बांधकाम मंत्री ढवळीकर म्हणाले.
स्व. ज्ॉक सिक्वेरा यांच्याविषयी आम्हाला आदर आहे पण जनमत कौल चळवळीत अनेकांचे योगदान आहे. गोव्यातील अनेक देवस्थानेही विलीनीकरणाविरुद्ध होती. सावईवेरेचे सावईकर कुटूंबही विलीनीकरणाविरुद्ध होते. या सगळ्य़ांचे योगदान तसेच गोवा मुक्ती लढय़ातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान प्रतिमा व आकृतींच्या रुपात मांडण्यासाठी एक उद्यान सरकारने विकसित करावे. पणजीपासून पंधरा किलोमीटर अंतरावर जागा उपलब्ध आहे असे ढवळीकर म्हणाले. राममनोहर लोहिया हे असोल्डा येथे मिनेङिास कुटूंबाकडे येऊन राहिले होते व मिनेङिास कुटूंबाचे गोवा मुक्ती लढय़ात व जनमत कौल चळवळीतही योगदान आहे, असे ढवळीकर म्हणाले.