तिसवाडीत 'अंडर करंट'? रमाकांत खलप यांनी श्रीपाद नाईक यांना बऱ्यापैकी दिली टक्कर

By किशोर कुबल | Published: May 18, 2024 10:53 AM2024-05-18T10:53:18+5:302024-05-18T10:59:32+5:30

काँग्रेस उमेदवार रमाकांत खलप यांनी भाजपकडून सहाव्यांदा निवडणूक लढवणारे श्रीपाद नाईक यांना बऱ्यापैकी टक्कर दिलेली आहे.

ramakant khalap gave shripad naik a fair fight for lok sabha election 2024 | तिसवाडीत 'अंडर करंट'? रमाकांत खलप यांनी श्रीपाद नाईक यांना बऱ्यापैकी दिली टक्कर

तिसवाडीत 'अंडर करंट'? रमाकांत खलप यांनी श्रीपाद नाईक यांना बऱ्यापैकी दिली टक्कर

किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: तिसवाडी तालुक्यातील मतदारसंघांमध्ये कानोसा घेतला असता मतदारांमध्ये 'अंडर करंट' दिसून आला. काँग्रेस उमेदवार रमाकांत खलप यांनी भाजपकडून सहाव्यांदा निवडणूक लढवणारे श्रीपाद नाईक यांना बऱ्यापैकी टक्कर दिलेली आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सांताक्रूझमध्ये २०१९ च्या तुलनेत कमी मतदान झालेले आहे. काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांनी गेल्या वेळी नाईक यांच्यापेक्षा २,८०० मतांची आघाडी घेतली होती. यंदा काँग्रेसला आणखी फायदा होऊ शकतो. कारण निरीक्षकांच्या मते विद्यमान आमदार रुडॉल्फ फर्नांडिस भाजपमध्ये गेल्याने लोक नाराज आहेत.

एका वकिलाने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, 'काँग्रेसचे संघटन चांगले असते तर खलप निवडून येतील असे खात्रीने सांगता आले असते; परंतु तसे सांगण्याचे धाडस करता येणार नाही. एवढेच म्हणावे लागेल की, खलपांनी चांगली टक्कर दिली आहे.'

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कुंभारजुवेत नाईक यांनी १५०० मतांची आघाडी घेतली होती. २०१९ च्या तुलनेत यंदा या मतदारसंघात अधिक ७०० मतदान झाले. ते कोणाच्या फायद्याचे ठरते हे कळेल.. काँग्रेसचे फुटीर आमदार राजेश फळदेसाई व स्थानिक भाजप मंडळने खरोखरच जुळवून घेतले का, हे स्पष्ट होईल.

दिवाडी येथील रहिवासी एडी पिकाडो म्हणाले की, यावेळी लोकांना बदल हवा आहे. भाजपने २५ वर्षे सत्ता भोगलेलाच उमेदवार पुन्हा दिला. बेटांवर कोणताही विकास झालेला नाही. युवकांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. खासगी क्षेत्रात नोकऱ्या देता आल्या असत्या त्यादेखील दिलेल्या नाहीत. जाती-धर्मात फूट पाडण्याचे राजकारण चालले आहे ते घातक आहे.'

श्रीपाद नाईक यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पणजी मतदारसंघात काँग्रेस प्रतिस्पर्ध्यापेक्षा २ हजार मते जास्त मिळवली होती. बाबूश मोन्सेरात हे त्यावेळी काँग्रेसच्या बाजूने होते आणि त्याचवेळी झालेल्या पणजी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ते जिंकले होते. पणजीत आरजीचे अस्तित्व तसे मोठे नाही. पणजी विधानसभा मतदारसंघ हा राज्यात सर्वांत कमी मतदान नोंदवणारा दुसऱ्या क्रमांकावरील मतदारसंघ ठरला आहे. २०१९ साली सुमारे १६ हजार मतदान झाले होते. यंदा १५,३३७ जणांनी मतदान केले. ताळगावमध्ये २०१९ च्या तुलनेत जास्त मतदान झालेले आहे.

सांत आंद्रेचे प्रतिनिधित्व सध्या आरजीचे एकमेव आमदार वीरेश बोरकर करत आहेत. त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष मनोज परब उत्तर गोवा मतदारसंघातून रिंगणात आहेत. त्यामुळे बोरकर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सांता आंद्रेतील अनेक लोक जे आखातात नोकरीला असतात ते मुद्दामहून बोरकर यांना मते देण्यासाठी आले होते. यावेळी तसे घडलेले नाही.
 

Web Title: ramakant khalap gave shripad naik a fair fight for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.