‘रामायण’ ‘रंगविले’ होते गोव्याच्या सुपुत्राने
By सचिन खुटवळकर | Published: April 24, 2020 09:14 AM2020-04-24T09:14:39+5:302020-04-24T11:49:03+5:30
रंगभूषाकार स्व. गोपाळ सावंत : चोपडे-पेडणे येथे मूळ गाव; सावंत कुटुंबीयांनी मुंबईत जपलाय रंगभूषेचा वारसा
सचिन खुटवळकर/दोडामार्ग
सध्या दूरदर्शनवरील पुन:प्रक्षेपणामुळे चर्चेत असलेल्या ‘रामायण’ मालिकेच्या उभारणीत एका गोमंतकीय सुपुत्राने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ते म्हणजे बॉलीवूडमधील प्रख्यात रंगभूषाकार स्व. गोपाळ सावंत. ‘रामायण’चे प्रमुख मेकअप आर्टिस्ट असलेले सावंत मूळचे चोपडे (ता. पेडणे, जि. उत्तर गोवा) येथील. सध्या त्यांचा वारसा त्यांचे पुतणे किशोर सावंत समर्थपणे चालवित आहेत.
सुमारे ५५ वर्षांपूर्वी सावंत कुटुंबीयांनी रोजीरोटीसाठी गोवा सोडला आणि मुंबईत स्थायिक झाले. गोपाळ सावंत व रामचंद्र सावंत या बंधूंनी सिनेसृष्टीत रंगभूषेच्या क्षेत्रात मुशाफिरी करण्याचे ठरविले. अंगभूत कौशल्याच्या जोरावर अल्पावधीतच त्यांनी चांगले नाव कमविले. हिंदी चित्रपटसृष्टीत मेकअप आर्टिस्ट म्हणून लौकिक मिळविला. १९८६ मध्ये रामानंद सागर यांनी ‘रामायण’ मालिकेची जुळवाजुळव केली आणि प्रमुख रंगभूषाकार म्हणून गोपाळ सावंत यांच्यावर जबाबदारी सोपविली. एका अर्थाने सावंत यांना मिळालेला हा मोठा ‘ब्रेक’ होता.
गोपाळ सावंत यांच्या दिमतीला त्यावेळी अनेक साहाय्यक रंगभूषाकार होते. त्यापैकी एक होते त्यांचे पुतणे किशोर सावंत. त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘आता ३३ वर्षांनंतर पुनश्च ‘रामायण’ प्रेक्षकांच्या भेटीला आल्यामुळे अनेक आठवणी जाग्या झाल्या. मी त्यावेळी वयाची विशी पार केली होती. वडील रामचंद्र सावंत व काका गोपाळ सावंत यांच्या पावलावर पाऊल ठेवून मीही रंगभूषाकार म्हणून वावरू लागलो. ‘रामायण’साठी सहरंगभूषाकार म्हणून काकांच्या हाताखाली काम सुरू केले. तिथे खूप काही शिकायला मिळाले. महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील उंबरगाव येथे चित्रीकरण सुरू होते. मालिकेचे निर्माते-दिग्दर्शक रामानंद सागर, त्यांचे सुपुत्र सहदिग्दर्शक आनंद सागर, प्रेम सागर आदी सर्वांनी खूप मेहनत घेतली. कलाकार अतिशय नम्र होते. आताच्या काही कलाकारांसारखा बडेजाव मुळीच नव्हता. आठवड्याला एक सुट्टी असायची व सर्वच मिळूनमिसळून राहायचो. लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा भेदभाव नव्हता. ते दिवस इतके मंतरलेले होते की, मालिका बघताना आजही प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर तरळून जातो.’
आपले पूर्वज गोव्याचे असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे किशोर सावंत म्हणाले. एक-दोन वर्षांआड गोव्याला भेट देतोच. चोपडे हे मूळ गाव असले, तरी तेथे घर वगैरे नाही. त्यामुळे पार्से येथील नातेवाइंकांकडे आपण जातो, असे ते म्हणाले.
अवघे कुटुंब रंगले रंगभूषेत...
गोपाळ सावंत यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी रंगभूषाकार म्हणून काम केले. त्यांचे बंधू रामचंद्र सावंत हे रेखा यांचा मेकअप करायचे. २५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी रेखा यांच्यासोबत काम केले. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र विजय सावंत यांनीही रंगभूषेत नावलौकिक कमावला. कनिष्ठ सुपुत्र किशोर सावंत आजघडीला हिंदी मालिकांमधील आघाडीचे रंगभूषाकार म्हणून कार्यरत आहेत. ‘स्वस्तिक’ प्रॉडक्शन कंपनीसाठी ते काम करतात. स्टार वाहिनीवरील महाभारत, सूर्यपुत्र कर्ण, शनिदेव, महाकाली, चंद्रगुप्त मौर्य, बाळकृष्ण आदी मालिकांसाठी त्यांनी योगदान दिले आहे. ‘पराशक्ती देवी’ या मालिकेसाठी सध्या काम करत आहेत. रेखा, उर्मिला मातोंडकर, नगमा, ग्रेसी सिंग, प्रिती झिंटा आदी तारकांसोबत त्यांनी दीर्घकाळ काम केले. मालिकांमधील व्यग्र वेळापत्रकामुळे चित्रपट क्षेत्रासाठी वेळ देता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.