रामदास आठवलेंनी केला गोव्यात वाद, अनुसूचित जमाती आरक्षण विधानावर तीव्र पडसाद
By किशोर कुबल | Published: October 10, 2023 06:45 PM2023-10-10T18:45:12+5:302023-10-10T18:48:05+5:30
गृहपाठ करुन नंतरच बोला : विरोधी पक्षनेत्याने सुनावले
पणजी : गोव्यात अनुसूचित जमातींना (एसटी समाज)विधानसभा आरक्षण अशक्य असल्याच्या केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी आठवलेंच्या विधानावर टीका करताना त्यांनी आधी गृहपाठ करुन नंतरच बोलावे, असा सल्ला दिला आहे. आठवले कोणत्या जनगणनेचा हवाला देत आहेत?, असा सवाल करुन युरी म्हणाले कि, ते एकीकडे एसटींना आरक्षण शक्य नसल्याचे सांगताना दुसरीकडे एससींना आरक्षण वाढवून द्यावे, अशी मागणी करीत आहेत. हा मोठा विनोद आहे.’
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनीही आठवलेंच्या विधानाचा खरपूस समाचार घेताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या विधानावर एसटी बांधवांसाठी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. सरदेसाई म्हणाले कि,‘ आठवलेंचे हे विधान धक्कादायक व अयोग्य आहे. आठवलेंनी केलेला हा विनोद की भाजप सरकारचे धोरण? असा प्रश्न करुन सरदेसाई यांनी विचारला.
पुढे असे म्हटले की, ‘ गोवा विधानसभेने एकमताने ठराव घेऊन एसटी समाजाला विधानसभा व लोकसभेत आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी याआधीच केलेली आहे. आठवले यांनी आता या विषयावर जे काही विधान केले आहे त्यावर मुख्यमंत्र्यांनी एसटी समाजाकरिता आपली भूमिका स्पष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे. आठवलेंचे विधान वरकरणी घेता येणार नाही. सरकारचे काय धोरण आहे हे सर्वांनाच कळायला हवे. भाजपचे डबल इंजिन सरकार एसटी बांधवांना पुन्हा फसवायला निघाले आहे का?, असा संतप्त सवालही सरदेसाई यांनी केला आहे.