रामदास कामत यांचे योगदान असामान्य: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2025 09:37 IST2025-02-19T09:36:29+5:302025-02-19T09:37:42+5:30
साखळी रवींद्र भवनच्या परिषद कक्षाचे नामकरण

रामदास कामत यांचे योगदान असामान्य: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : साखळीचे सुपुत्र दिवंगत पंडित रामदास कामत यांचे नाट्य क्षेत्रातील व गायन क्षेत्रातील योगदान महान आहे. या सुपुत्राने जागतिक पातळीवर साखळीचे नाव अजरामर केले. त्यांच्या स्मृती नव्या पिढीच्या स्मरणात राहाव्यात, याच हेतूने रवींद्र भवनाच्या परीषद कक्षाचे नामकरण पंडित रामदास कामत कक्ष असे करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली.
साखळी रवींद्र भवनात पंडित रामदास कामत जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. परिषद कक्षाच्या नामकरण फलकाचे अनावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री म्हणाले की, आज अनेक कलाकार घडत असताना त्यांचा हेतू हा नोकरीपुरता मर्यादित न राहू नये. त्यांनी सातत्याने रियाज करणे गरजेचे आहे. सातत्याने रियाज केल्याने कामत यांच्यासारखे दर्जेदार कलावंत घडू शकतात. त्यासाठी संगीत आराधनेत सातत्य महत्त्वाचे आहे.
मेहनतीने कला जोपासा
सावंत म्हणाले की, पंडित रामदास कामत यांनी मराठी नाट्यसृष्टीत अनेक अजरामर भूमिका केल्या. तसेच, गायन करताना नाट्य संगीताला एका वैशिष्ट्यपूर्ण उंचीवर नेऊन ठेवलेय, त्यांचे सतत स्मरण नव्या पिढीच्या गायकांनी करायला हवे. त्यांचा आदर्श घेऊन मेहनतीने कला जोपासावी.
कारेकर यांना आदरांजली
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी ज्येष्ठ गायक स्वर्गीय पंडित प्रभाकर कारेकर यांच्या कार्याचाही गौरव करत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले व पुष्पहार अर्पण केला. रवींद्र भवनचे उपाध्यक्ष विशांत चिमुलकर, संचालक, कला सन्मान पुरस्कार विजेते कलाकार व संगीतप्रेमी उपस्थित होते.