रमेश तवडकर बनले गोवा विधानसभेचे ८ वे अध्यक्ष; ठराव २४ विरुद्ध १५ संमत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 01:03 PM2022-03-29T13:03:21+5:302022-03-29T13:05:17+5:30
नवीन विधानसभेचे सभापती म्हणून आमदार रमेश तवडकर यांची २४ विरुद्ध १५ मतांनी निवड झाली आहे.
पणजीः नवीन विधानसभेचे सभापती म्हणून आमदार रमेश तवडकर यांची 24 विरुद्ध 15 मतांनी निवड झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हंगामी सभापती म्हणून राज्यपालांनी नियुक्त केलेले गणेश गांवकर यांच्या अध्यक्षतेखाली सभापतीपदासाठी मतदान प्रक्रिया पार पाडली. सुभाष शिरोडकर यांनी तवडकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि आलेक्स रेजिनाल्ड यांनी त्यांना अनुमोदन दिले.
त्यानंतर कॉंग्रेसचे आमदार दिगंबर कामत यांनी कॉंग्रेसचे आलेक्स सिक्वेरा यांच्या नावांचा प्रस्ताव सभापतीपदासाठी मांडला. या प्रस्तावाला मायकल लोबो यांनी अनुमोदन दिले. सभापतींनी शिरोडकर यांनी मांडलेल्या तवडकर यांच्यासाठीच्या प्रस्तावावर पूर्वी मतदान घेतले. प्रस्तावाला समर्थन देणाऱ्यांना उभे राहण्याची सूचना केली तेव्हा सर्व 19 भाजप आमदार, तीन अपक्ष आणि मगोच्या दोन आमदार उभे राहिले. ठरावाच्या विरोधात अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेसचे 12, आम आदमी पार्टीचे दोन आणि रिवोल्युशनरी गोवन्सचा एक आमदार उभे राहिले. त्यामुळे सभापतींनी तवडकर यांच्या नावाचा प्रस्ताव 24 विरुद्ध 15 असा संमत झाल्याचे जाहीर केले आणि तवडकर यांची सभापती म्हणून निवड झाल्याचेही जाहीर केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि कॉंग्रेसचे आमदार दिगंबर कामत यांनी तवडकर यांना सन्मानाने सभापतीच्या आसनापर्यत नेले. हंगामी सभापती गणेश गांवकर यांनी आसनावरून उठून त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्यासाठी आसन खाली केले. तवडकर यांनी सभापती आसन स्वीकारत पदाचा कार्यभार स्वीकारला.