गेल्या दोन वर्षांपासून गोव्यात 'रामराज्य'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 04:10 PM2023-07-19T16:10:41+5:302023-07-19T16:11:51+5:30
एसीबीकडून ३ मार्च २०२१ नंतर भ्रष्टाचाराचा एकही एफआयआर नाही
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : लाचखोरीच्या तक्रारी कमी येत असल्यामुळे गोव्यात रामराज्य नांदत असावे, असे उद्गार एका सीबीआय अधीक्षकाने काढले होते. ते उद्गार सार्थ ठरविणारी आकडेवारी दक्षता खात्याने सादर केली आहे.
वर्ष २०२१ मध्ये मार्च महिन्यात भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून एक गुन्हा नोंदविण्यात आला. जलस्रोत खात्यातील भ्रष्टाचार प्रकरणाचा हा गुन्हा दक्षता खात्याकडून नोंदवलेला शेवटचा गुन्हा ठरला. नंतर आतापर्यंत एकही गुन्हा नोंदलेला नाही. २०२१ मध्ये मार्चनंतर एकही गुन्हा नोंदविला नाही. २०२२ वर्षही गुन्हे न नोंदविता कोरडे गेले आणि वर्ष २०२३ मध्येही ४ जुलैपर्यंत एकही गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. म्हणजेच जवळजवळ २ वर्षे एकही गुन्हा नोंदविला नसल्याची माहिती गोवा विधानसभेत सादर झाली आहे.
आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी हा प्रश्न विचारला होता. त्यांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरातील ही माहिती आहे. एसीबीकडून २०१८ मध्ये ११ प्रकरणात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. २०१९ मध्ये ९ प्रकरणात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, २०२० मध्ये ५ तर २०२१ मध्ये ३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
फाईल बंद करणे शेकले अंगावर
एसीबीकडे तक्रारींचा डोंगर पडतो, परंतु मोजक्याच तक्रारींची दखल घेऊन गुन्हे नोंदविले जातात. नोंदवलेल्या गुन्ह्यातून फार निष्पन्न होत नाही. बहुतेक प्रकरणात फाईल बंद केली जाते. अशीच एक फाईल बंद करणे एसीबीला महागात पडले. न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा खुले करून नव्याने तपास करण्याचा आदेश दिला.