रिकाम्या सीटवर बसण्याठी धावला अन् रेल्वेतून खाली पडला; सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2024 12:19 PM2024-09-19T12:19:19+5:302024-09-19T12:21:24+5:30

इमर्जन्सी खिडकी उघडी राहिल्याने घडली दुर्दैवी घटना, ०१ सप्टेंबर रोजी वाढदिवस केला साजरा

ran to sit on an empty seat and fell off the train seven year old boy died | रिकाम्या सीटवर बसण्याठी धावला अन् रेल्वेतून खाली पडला; सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू

रिकाम्या सीटवर बसण्याठी धावला अन् रेल्वेतून खाली पडला; सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: शिर्डीहून देवदर्शन करून गोव्यात परतत असताना अचानक रेल्वेच्या आपत्कालिन (इमर्जन्सी) खिडकीतून बाहेर पडलेल्या आराध्य राजेश मांद्रेकर (७) या मुलाचा लोणी-पुणे येथे उपचारावेळी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताचा त्याच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

सविस्तर वृत्त असे की, पेड, मडगाव येथील तीन कुटुंबिय शुक्रवार, १३ रोजी शिर्डीला गेले होते. तिथे देवदर्शन घेतल्यानंतर सोमवार, १६ रोजी ते गोवा एक्सप्रेसने परतीच्या प्रवासाला निघाले. रात्री जेवणानंतर सर्वजण झोपण्याच्या तयारीत होते. आई झोपण्यासाठी बॅगेतील अंतरूण काढत असताना समोर रिकाम्या सीटवर बसण्यासाठी धावत गेलेल्या आराध्य अचानक इमरजन्सी खिडकीतून बाहेर फेकला गेला. त्याचवेळी त्याच्या आईने आरडाओरड केली असताना सहप्रवाशांनी रेल्वेची चेन खेचली. घटनास्थळापासून साधारणः १ किमी अंतरावर रेल्वे थांबली.

त्यानंतर आराध्यचे कुटुंबिय त्याला शोधण्यासाठी गेले असता झुडपात तो निपचित पडल्याचे दिसून आले. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याला पुढील स्टेशनवर थांबवून इस्पितळात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार सुरू करून लोणी येथे नेण्यात आले. मात्र, बुधवारी दुपारी त्याची प्राणज्योत मालवली. दौंड येथे आराध्य रेल्वेतून खाली पडला होता. वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

मित्रांसोबत वाढदिवस.... 

आराध्यचा १ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. आपल्या वाढदिवसाला सर्व मित्रांना बोलवण्याचा हट्ट त्याने कुटुंबीयांकडे केला होता. त्यानुसार त्याच्या कुटुंबीयांनी मित्र परिवारासमवेत मडगावातील एका हॉटेलमध्ये त्याचा थाटामाटात वाढदिवस साजरा केला, नियतीने त्याचा हा आनंद फार काळ टिकू दिला नाही. आराध्य मडगावातील लॉयोला हायस्कूलमध्ये दुसरीच्या वर्गात शिकत होता. या घटनेने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमके काय घडले... 

आराध्य आपल्या कुटुंबीयांसह शिर्डीहून गोव्याकडे येण्यासाठी निघाला होता. ते ज्या रेल्वेच्या डब्यात बसले होते, त्यांच्या समोरच्या सीटवर इतर प्रवासीही होते. थोड्या वेळाने ते प्रवासी त्यांच्या थांब्यावर उतरले. काही वेळाने त्या रिकाम्या झालेल्या सीटवर बसण्यासाठी आराध्य त्या दिशेने धावला. तत्पूर्वीच त्या सीटवर असणारी इमर्जन्सी खिडकी कोणीतरी उघडी ठेवली होती. चालू रेल्वेत आराध्य सीटवर बसत असताना अचानक तो त्या खिडकीतून बाहेर फेकला गेला आणि पडला. यातच्या त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
 

Web Title: ran to sit on an empty seat and fell off the train seven year old boy died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.