बाहुबलीतील भूमिकेमुळे राणाला जागतिक दर्जा - सुरेशबाबू दग्गुबाटी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 09:40 PM2018-11-26T21:40:07+5:302018-11-26T21:40:45+5:30
‘बाहुबली’मुळे माझ्या मुलाला मोठा कॅनव्हास मिळाला, त्याच्या या चित्रपटातील भल्लालदेव या नकारात्मक भूमिकेमुळे जागितक ओळख मिळाली.
- संदीप आडनाईक
पणजी - ‘बाहुबली’मुळे माझ्या मुलाला मोठा कॅनव्हास मिळाला, त्याच्या या चित्रपटातील भल्लालदेव या नकारात्मक भूमिकेमुळे जागितक ओळख मिळाली. दग्गुबाटी परिवारातील सर्वांनीच सिनेमा क्षेत्रासाठी मोठे योगदान दिले आहे, यापुढेही देतील, असे मत ज्येष्ठ सिनेमा निर्माते सुरेशबाबू दग्गुबाटी यांनी व्यक्त केले.
गोव्यात सुरू असलेल्या ४९व्या आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डिकोडिंग द दग्गुबाटी या सत्रासाठी ते येथे आले होते. अभिनेता अंबरिश यांच्या निधनामुळे या सत्रासाठी अभिनेते राणा दग्गुबाटी, अभिनेता व्यंकटेश उपस्थित राहू शकले नाहीत; मात्र त्यांचे वडील निर्माते आणि प्रसाद प्रॉडक्शनचे सर्वोसर्वा सुरेशबाबू दग्गुबाटी यांनी सोमवारी इफ्फी परिसराला भेट दिली.
प्रसाद प्रॉडक्शनने यापूर्वी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तोहफा, मकसद यांसारख्या चित्रपटांसोबतच त्यांनी अलीकडे मख्खीसारखा चित्रपट केला, तो गाजला. वडील डी रामा नायडू यांनी या चित्रसंस्थेमार्फत अनेकांना संधी दिली. नेहमीच नव्या नायिकेला संधी दिल्यामुळे अनेक कलाकार आज प्रसिध्दीच्या शिखरावर आहेत. बंधू व्यंकटेश, करिष्मा कपूर, तब्बू, सौंदर्या, श्रीया सरन, कॅथरिना कैफ, दिव्या भारती यांना मोठे करण्यात प्रसाद प्रॉडक्शनचा मोठा हात आहे. ते आज मोठे स्टार आहेत, याचे मला समाधान आहे. माझ्या वडिलांनीही वेगवेगळ्या नवोदित अभिनेत्यांना संधी दिली, तीच परंपरा मी पुढे कायम ठेवली, असे ते म्हणाले.
हिंदीतील अनेक कलावंतांना त्यांनी तेलगू चित्रपटात प्रमुख भूमिका दिल्या. अनेक चित्रपट प्रथम तेलगूत निघाले, त्यानंतर इतर भाषेतही ते गाजले. दृश्यमसारखा सिनेमा याचे उदाहरण आहे. भविष्यात प्रादेशिक भाषेतही डब न करता थेट सिनेमा करण्याची योजना आहे, असे ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. मराठी, बंगाली, हिंदीसह सर्वच भाषेत सिनेमा करणार आहे. माझ्या वडिलांनीही १८ भाषेत सिनेमे केले आहेत, आता आम्ही त्यांचा कित्ता पुन्हा गिरवणार आहोत.
राणाला जेव्हा भल्लालदेवच्या भूमिकेमुळे मोठे यश मिळाले, तेव्हा खूप अभिमान वाटला. त्याला जगभरात या भूमिकेमुळे ओळख मिळाली. चित्रपटाच्या कथेच्या बाबतीत तो नेहमीच चौकस राहिला आहे. बाहुबलीच्या यशानंतर रामोजी राव फिल्मसिटीमध्ये त्याचा पुतळा कायम ठेवला, याचा मला अभिमान वाटतो. आता त्याचे पात्र जगाच्या पाठीवर ओळखले जाते. नव्या दमाच्या सिनेमा निर्मात्यांना इफ्फीसारखे व्यासपीठ वारंवार मिळते आहे, हे लक्षणीय आहे.