राणी पद्मावतीचे नृत्य इतिहासाशी विसंगत, गोव्यातही चित्रपटाला विरोध करण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 01:08 PM2017-11-18T13:08:24+5:302017-11-18T13:08:39+5:30
जयलीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यास कोणी आक्षेप घेतला नाही तर आमचाही त्यास विरोध असणार नाही.
पणजी - संजयलीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यास कोणी आक्षेप घेतला नाही तर आमचाही त्यास विरोध असणार नाही, असे स्पष्टीकरण येथील राष्ट्रप्रेमी संघटनांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, या चित्रपटात राणी पद्मावतीचे नृत्य हे आक्षेपार्ह असून ते इतिहासाशी सुसंगत नाही, त्यामुळे तेही वगळावे अशी मागणी या संघटनांनी केली.
हिंदू जनजागृती समिती व राजस्थानच्या नागरिकांची राष्ट्रप्रेमी संघटनांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी के. के. चतुव्रेदी, गजेंद्रसिंग राजपूत, मनोहर सिंग गौड, राजकमलसिंग राजपूत, बाबूलाल सोनी, नारायण सिग राजपूत, जयेश थळी यांची उपस्थिती होती.
गजेंद्रसिंग राजपूत म्हणाले की, संजय लिला भन्साळी हे इतिहासाची तोडफोड करून चित्रपट निर्माण करतात, हा त्यांचा इतिहास आहे. पद्मावती चित्रपटात चित्तोडची राणी पद्मावतीच्या जोहर (सती जाण्याची प्रता) जाण्यामागील कथा आपल्या चित्रपटात आणली असली तरी, पद्मावती ही नर्तकी नव्हती. तरीही भन्साळी यांनी तिचे नृत्य चित्रपटात दाखविले आहे.
जर अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वप्नातही ती नृत्य करताना आली असेल, तर ते काल्पनिक नृत्य दाखविले गेले असावे असा प्रश्न उपस्थितांना केला तेव्हा भन्साळी यांनी इतिहासच पुढे मांडावा, त्यास काल्पनिकतेची जोड देऊ नये. राजस्थानमध्ये पद्मावती ही महिलांसाठी श्रद्धास्थान आहे. त्यामुळे चित्रपटाचे चित्रिकरण सुरू असताना तेथील करणी सेनेने त्यास विरोध केला आहे. खरा इतिहास मांडण्यास आमचा विरोध नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर हा चित्रपट कोणी पाहिला आहे का? असा सवाल केल्यावर अद्याप चित्रपट पाहिला नाही, पण त्याच्या ट्रेलरवरून ते स्पष्ट दिसते, असे चतुव्रेदी म्हणाले.
दत्ता नाईक म्हणाले की, भन्साळी हे आधुनिक काळातील जयचंद आहेत. पु. भा. भावे यांनी पद्मावती राणीवर नाटक काढले, त्यात इतिहासाची अजिबात तोडफोड केलेली नाही. उलट पद्मावतीच्या पात्रला उच्च स्थान दिले आहे. चित्रपटवाले मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे इतिहासाचा गैरवापर करतात. त्यांना देशातील जनतेच्या भावनांची अजिबात कदर नाही. भन्साळी यांचा आम्ही निषेध करीत असून, त्यांच्या या चित्रपटाला विरोध आमचा कायम विरोध राहील. थळी म्हणाले की, भन्साळी यांनी हा चित्रपट प्रथम राष्ट्रप्रेमी संघटनांना दाखवावा. त्यांना या चित्रपटात काही आक्षेपार्ह वाटले, तर त्यांना तो भाग वगळावा.