बाप्तिस्ता डिकॉस्ता खून समलिंगी अत्याचारातून, कोलवा पोलिसांकडून रिक्षा ड्रायव्हरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 05:25 PM2018-01-23T17:25:02+5:302018-01-23T18:05:18+5:30
मडगावपासून सात कि.मी. अंतरावर असलेल्या बेताळभाटी येथील लवर्स बिचवर तीन दिवसांपूर्वी झालेल्या बाप्तिस्ता डिकॉस्ता या रेंट अ बाईकचा व्यवसाय करणा-या व्यावसायिकाच्या खूनाचे गुढ उलगडले असून या प्रकरणात कोलवा पोलिसांनी याच परिसरातील रिक्षा ड्रायव्हर अमन कवाटिया याला अटक केली आहे.
- सुशांत कुंकळयेकर
मडगाव : मडगावपासून सात कि.मी. अंतरावर असलेल्या बेताळभाटी येथील लवर्स बिचवर तीन दिवसांपूर्वी झालेल्या बाप्तिस्ता डिकॉस्ता या रेंट अ बाईकचा व्यवसाय करणा-या व्यावसायिकाच्या खूनाचे गुढ उलगडले असून या प्रकरणात कोलवा पोलिसांनी याच परिसरातील रिक्षा ड्रायव्हर अमन कवाटिया याला अटक केली आहे. अनैसर्गिक संभोगाच्या बळजबरीतून हा खून झाला असावा असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
मागच्या रविवारी बेताळभाटी बिचवर डिकॉस्ता याचा मृतदेह सापडला होता. त्याचा गळा चिरुन खून केला होता. मात्र खून करतेवेळी मयत अर्धनग्न अवस्थेत असल्याने या खूनाबद्दलचे गूढ वाढले होते. मंगळवारी कोलवा पोलिसांनी या खुन्याला जेरबंद केले. खुनी अमन हा मूळ गुजराती असून तो गोव्यातच वाढला आहे. संशयित या भागात रिक्षा चालविण्याचे काम करत होता. त्याच्या गरिबीचा फायदा उठवून मयताकडून त्याच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले जात असल्यामुळेच हा खून केला असावा असा प्राथमिक निष्कर्ष व्यक्त केला जात आहे.
शनिवारी रात्री मयत डिकॉस्ता व संशयित अमन हे दोघेही बेताळभाटीच्या या बिचवर होते. त्यानी रात्रीच्यावेळी दारुही पिली होती. जवळच्याच दुकानातून त्यानी ही दारु खरेदी केली होती. रात्रीच्यावेळी मयताकडून संशयितावर बळजबरीचा प्रयत्न होत असतानाच हा खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणो, मागची कित्येक वर्षे संशयित मयताच्या संपर्कात होता. सुरुवातीला मयताकडून पैशांच्या मोबदल्यात अनैसर्गिक संभोग करण्याचे प्रकार घडले होते. त्यानंतर हे प्रकार वारंवार घडू लागले. त्यातही संशयिताला मयताकडून पैशांचा मोबदला मिळत नसे. त्यामुळेच हा खून झाला असावा असा कयास व्यक्त केला जात आहे.
ज्या रात्री हा खून झाला त्या दिवशी एका गाडी विक्रीच्या व्यवहारातून मयताकडे पैसे आले होते. मयताने संशयिताला तीन हजार रुपये देण्याचा वायदा करुन त्या रात्री बिचवर नेले होते. मात्र मयताकडून पैसे देण्यास टाळाटाळ झाल्यानंतर हा खून करण्यात आला असावा असा पोलिसांचा निष्कर्ष आहे. या घटनेनंतर मयताकडील पैसे तसेच सोन्याचे दागिने गायब झाले होते.