ऐन दिवाळीत वीज बिलांचा 'शॉक', एफपीपीसीएमुळे वाढले दर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 03:10 PM2018-11-02T15:10:03+5:302018-11-02T15:18:26+5:30
ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या काळासाठी एफपीपीसीएमुळे वीज दर वाढले आहेत. घरगुती वापराच्या विजेसाठी 400 युनिटपेक्षा अधिक वापर झाल्यास प्रती युनिट 18
पणजी - गोव्यात भर दिवाळीत ग्राहकांना वीज बिल दरवाढीचा फटका बसणार आहे. एफपीपीसीएमुळे (फ्युअल अॅण्ड पॉवर परचेज कॉस्ट एडजस्टमेंट) वाढीव रकमेची वीज बिले ग्राहकांच्या हाती पडणार असून पुढील तीन महिन्यांसाठी ही दरवाढ लागू असल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या काळासाठी एफपीपीसीएमुळे वीज दर वाढले आहेत. घरगुती वापराच्या विजेसाठी 400 युनिटपेक्षा अधिक वापर झाल्यास प्रती युनिट 18 पैसे दरवाढ होणार आहे. वीजमंत्री निलेश काब्राल यांच्याशी संपर्क साधला असता राज्य सरकारने युनिटचे दर वाढविलेले नाहीत तर एफपीपीसीएमुळे ही दरवाढ झालेली आहे, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की,‘इंधन व कोळशाचे दर वाढल्यास वीज निर्मितीवरील खर्चही वाढतो त्यामुळे सरकारला वीज खरेदीसाठी जादा पैसे बाहेर काढावे लागतात. एफपीपीसीएमुळे दरवाढ होणार असली तरी ती अल्प आहे. तीन महिन्यांनी आढावा घेतला जातो. गेल्या तिमाहीत दर खाली आले होते. सरकारने युनिटचे दर वाढविलेले नसून नजीकच्या काळातही दरवाढ करण्याचा विचार नाही. राज्य सरकार बाहेरुन वीज घेते आणि फ्युअल अॅण्ड पॉवर परचेज कॉस्ट एडजस्टमेंट करारानुसार प्रत्येक तिमाहीत दरांचा आढावा घेतला जातो. कधी दर कमी होतात तर कधी वाढतात. संयुक्त वीज नियमन आयोगाच्या निर्देशानुसारच हे केले जाते.’
प्राप्त माहितीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत घरगुती वापराच्या विजेसाठी 0 ते 100 युनिटकरीता प्रति युनिट 7.39 पैसे, 101 ते 200 युनिटकरिता 9.90 पैसे, 201 ते 300 युनिटकरिता 12.80 पैसे, 301 ते 400 युनिटकरिता प्रति युनिट 15.97 पैसे तर 400 पेक्षा जास्त युनिटकरिता प्रती युनिट 18.08 पैसे अशी दरवाढ झालेली आहे.
व्यावसायिक आस्थापनांसाठी कमी दाबाच्या विजेचे दरही वाढलेले आहेत. 0 ते 100 युनिटकरिता प्रती युनिट 17.95 पैसे, 101 ते 200 युनिटकरिता प्रती युनिट 19.18 पैसे, 201 ते 400 युनिटकरिता प्रती युनिट 21.91 पैसे तर 400 पेक्षा जास्त युनिटकरिता प्रती युनिट 24.15 पैसे अशी दरवाढ झालेली आहे. वीज खात्याच्या वरिष्ठ अभियंत्याच्या दाव्यानुसार गोव्यात इतर राज्यांपेक्षा विजेचे दर तुलनेत कमीच आहेत. राज्य सरकारने घरगुती वापरासाठीच्या कमी दाबाच्या विजेचे दर 0 ते 100 युनिटकरीता प्रति युनिट 1 रुपया 40 पैसे, 101 ते 200 युनिटकरिता 2 रुपये 10 पैसे, 201 ते 300 युनिटकरिता 2 रुपये 65 पैसे, 301 ते 400 युनिटकरिता प्रति युनिट 3 रुपये 45 पैसे तर 400 पेक्षा जास्त युनिटकरिता प्रती युनिट 4 रुपये असे दर निश्चित केलेले आहेत. या व्यतिरिक्त एफपीपीसीएचा अतिरिक्त भार लागू झाला आहे.