गोव्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक अधिकतम विद्यालयांचे ‘रेटिंग’ तीन स्टार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 12:46 PM2019-10-02T12:46:51+5:302019-10-02T12:50:33+5:30
गोव्यातील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांची आता रेटिंगसाठी कसोटी लागली आहे. गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाने नुकत्याच केलेल्या पाहणीत राज्यातील अधिकतम विद्यालयांना तीन स्टार मिळालेले आहेत.
पणजी: गोव्यातील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांची आता रेटिंगसाठी कसोटी लागली आहे. गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाने नुकत्याच केलेल्या पाहणीत राज्यातील अधिकतम विद्यालयांना तीन स्टार मिळालेले आहेत. विद्यालयात पायाभूत सुविधा, अस्वच्छ प्रसाधनगृहे, अपुरे वाचनालय, अपूर्ण क्रीडा सुविधा, ई- लर्निंगच्या सुविधांचा अभाव, संगणक प्रयोगशाळा आहे पण त्यामध्ये एसीची सोय नाही. त्याचप्रमाणे डिजिटल सुविधांचा अभाव, विद्यालयाचे फेसबूक किंवा वॉटसअप खाते नसणे, अपुरा सभागृह, अपुरा स्टोअर रुम, मैदानाचा अभाव या गोष्टींमुळे गुण कमी होऊन रेटिंगही कमी मिळते. यावरुन असा निष्कर्ष निघत आहे की राज्यातील बऱ्याच विद्यालयांमध्ये या सुविधांचा अभाव आहे.
गोवा बोर्डाचे सचिव भगिरथ शेट्ये यांच्याकडून विद्यालयांचे रेटिंगविषयी माहिती घेतली असता असे आढळून आले की, राज्यात ३९४ माध्यमिक आणि १0७ उच्च माध्यमिक विद्यालये आहेत. चार स्टार प्राप्त केलेली विद्यालये सुमारे २0 टक्के आहेत तर तीन स्टार मिळालेल्या विद्यालयांची संख्या जास्त आहे. तीन स्टार मिळालेल्या विद्यालयांमध्ये कोणत्या ना कोणत्या सुविधांचा अभाव आहे.
भगिरथ शेट्ये म्हणाले की, ‘गोवा बोर्ड पेपरलेस बनविण्यासाठी तसेच पारदर्शकतेसाठी आणखीही काही उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत. ज्या विद्यालयांमध्ये कमतरता आढळून आलेल्या आहेत त्या त्यांनी भरुन काढाव्यात यासाठी बोर्डाचे प्रयत्न असून त्यांच्यासाठी कार्यशाळाही घेतल्या जात आहेत. पेडणें, कुडचडें येथे अशा कार्यशाळा घेतलेल्या आहेत. विद्यालयाचा नऊवी, दहावीचा निकाल, विद्यालयाची आर्थिक स्थिती, वार्षिक आॅडिट केले आहे की नाही, स्टाफ रुमची पुरेशी व्यवस्था आहे की नाही, मुख्याध्यापकांना बसण्यासाठी पुरेसे दालन आहे की नाही, विद्यालयाला स्वत:ची इमारत आहे की नाही, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत की नाहीत, कॅण्टीन व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, विशेष मुलांसाठी रॅम्प किंवा इतर सुविधा आहेत की नाहीत, सुरक्षा व्यवस्था याबाबतीत विद्यालयाची काय स्थिती आहे याची माहिती मिळते. शिवाय विद्यालयाची उपलब्धी, विद्यालयाने कोणते व किती पुरस्कार प्राप्त केले आहेत यासंबंधीही माहिती प्राप्त होते.
गोवा शालांत मंडळ आता पेपरलेस बनले आहे. आयटीची कास धरताना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांचे तब्बल २४ निकष लावून रेटिंगही करण्यात आले आहे. पायाभूत सुविधा, शिक्षकांची उपलब्धता, निकाल आदी निकषांवर राज्यातील या विद्यालयांची स्थिती काय आहे याची माहिती गोवा बोर्डाच्या संकेतस्थळावर एका क्लिकवर ही माहिती उपलब्ध झाली आहे. बोर्डाच्या अधिमान्यतेसाठी केले जाणाºया कागदोपत्री सोपस्कारांना पूर्णविराम मिळाला असून हे सर्व सोपस्कार आता आॅनलाइन होत आहे.
गोवा बोर्डाच्या संकेतस्थळावर संस्था या पर्यायावर क्लिक केल्यानंतर अधिमान्यता असलेल्या विद्यालयांची यादी येते. प्रत्येक विद्यालयाचे रेटिंग तसेच त्यांची इतर माहितीही उपलब्ध होते. रेटिंगमध्ये ज्या विद्यालयांना पाच स्टार मिळालेले आहेत त्यांना ७ वर्षे इन्स्पेक्शनच्या बाबतीत मुभा आहे. या विद्यालयांचे इन्स्पेक्शन केले जाणार नाही मात्र दरवर्षी त्यांनी पायाभूत सुविधा किंवा अन्य बाबतीत काही बदल असल्यास माहिती अपडेट करावी लागेल. बोर्डाच्या अधिमान्यतेसाठी पूर्वी अर्ज सादर करताना नक्कल अर्जही द्यावा लागत असे. कागदोपत्री सोपस्कारांमध्येच वेळ वाया जात होता. आता या सर्व गोष्टी आॅनलाइन केल्याने शाळा व्यवस्थापनांचाही वेळ वाचेल.