प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींचे लॉबिंग
By admin | Published: May 14, 2017 02:21 AM2017-05-14T02:21:04+5:302017-05-14T02:24:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री व आमदार रवी नाईक यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. लुईझिन फालेरो हे आता
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री व आमदार रवी नाईक यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. लुईझिन फालेरो हे आता प्रदेशाध्यक्षपदी राहणार नाहीत, याची कल्पना आल्यानंतर काँग्रेसच्या काही आमदारांचा पाठिंबा मिळविणे नाईक यांनी सुरू केले आहे आणि बहुतेक आमदारांनी नाईक यांच्यासाठी अनुकूलताही दाखवली आहे.
काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका येत्या महिन्यात सुरू होत आहेत. सदस्य नोंदणी मोहीम येत्या दि. १५ मेपर्यंत संपवावी असे ठरले होते; पण पक्षश्रेष्ठींनी त्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर सर्व सदस्यांची नावे काँग्रेसच्या वेबसाईटवर उपलब्ध केली जाणार आहेत. नवे प्रदेशाध्यक्ष निवडून आणण्यापेक्षा ते थेट दिल्लीहून सोनिया गांधी यांनी नियुक्त करावेत, अशा प्रकारची मागणी काही आमदार करू लागले आहेत. मोन्सेरात यांच्या निवासस्थानी झालेल्या काँग्रेसच्या सर्व आमदारांच्या बैठकीस रवी नाईक हेही उपस्थित राहिले होते. ख्रिस्ती प्रदेशाध्यक्षांऐवजी बहुजन समाजातील प्रदेशाध्यक्ष असावा, असे आमदारांचे म्हणणे आहे. काही आमदारांना प्रदेशाध्यक्षपदावरील व्यक्ती ही आमदार नसावी असे वाटते.
दरम्यान, चेल्लाकुमार हे तीन दिवसांची गोवा भेट आटोपून शनिवारी दुपारी दिल्लीला रवाना झाले. सोमवारी ते काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भेटून आपला अहवाल सादर करणार आहेत. चेल्लाकुमार पुन्हा येत्या महिन्यात गोव्यात येऊन नवे प्रदेशाध्यक्ष कोण असावेत, याविषयी चर्चा करतील, असे सूत्रांनी सांगितले. फालेरो यांच्याभोवती काँग्रेसमधील जी मंडळी गेली दोन वर्षे फिरत होती, त्यांना बदलाची चाहूल लागली असून त्यांनी रवी नाईक यांच्याशी आपली निष्ठा दाखविणे सुरू केले आहे.