ख्रिसचा कथित सहभाग असलेले जुने प्रकरण पुन्हा चौकशीस घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 09:05 PM2020-09-18T21:05:46+5:302020-09-18T21:06:00+5:30
काँग्रेस आमदारांची मागणी: ड्रग ओव्हरडोसमुळे दोन युवकांना आला होता मृत्यू
मडगाव: अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आलेल्या अमली पदार्थाच्या कोनाचा शोध घेताना एनसीबी गोव्यात अटक केलेल्या ख्रिस कॉस्ता याचा सहभाग पाच वर्षांपूर्वी मायणा (कुडतरी) येथे ड्रग्स ओव्हरडोसमुळे दोन युवकांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाशीही जोडला गेला होता अशी माहिती पुढे आलेली असतानाच या तपासाची फाईल पुन्हा खुली करा अशी मागणी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजीनाल्ड लॉरेन्स यांनी केली आहे.
एप्रिल 2015 मध्ये मायणा येथे एका युवकाच्या बिर्थडे पार्टीला अमली पदार्थांचे अतीसेवन केल्यामुळे पराग रायकर(21) व रॉडसन मोंतेरो (25) या दोघांना मृत्यू आला होता. या पार्टीला ड्रग्सचा पुरवठा ख्रिसने केला होता अशी माहिती त्यावेळी पुढे आली होती. या प्रकरणात त्यावेळी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. पण पुरेसा पुरावा पुढे न आल्याने पोलिसांनी ही केस बंद केली होती.
याच ख्रिसचा हात सुशांत राजपूत प्रकरणाशी असल्याने त्याला अटक करण्यात आली असून सध्या त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. सुशांतसिंग याला ड्रग्सचा पुरवठा ख्रिसकडून झाला होता असा एनसीबीचा दावा आहे.
याच ख्रिसचे नाव 5 वर्षांपूर्वी झालेल्या दोन युवकांच्या मृत्यू प्रकरणाशीही जोडले गेले होते, त्यामुळे पोलिसांनी बंद केलेली चौकशी पुन्हा सुरू करण्याची मागणी लॉरेन्स यांनी केली.
ते म्हणाले, माझ्या मतदारसंघात हा प्रकार घडला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी त्यावेळी मी स्वतः पोलीस अधीक्षक आणि उप अधीक्षकाना भेटलो होतो. या प्रकरणात मी विशेष रस घेतो म्हणून त्यावेळी माझ्यावर टीकाही झाली होती.
ते पुढे म्हणाले, माझ्या मतदारसंघातच नव्हे तर गोव्यात सगळीकडे चाललेल्या अमली पदार्थ व्यवहाराची पाळे मूळे खणून काढली पाहिजेत. मुख्यमंत्र्यांकडे मी तशी विनंती केली आहे. पोलीस आणि गुन्हेगार यांच्यात साटेलोटे असल्यामुळेच गुन्हेगारी फोफावते. अशा भ्रष्ट पोलिसांवरही कारवाई होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सध्या एनसीबीच्या ताब्यात असलेला हा ख्रिस कॉस्ता पूर्वी आपल्या आईसह कामुर्ली येथे त्यांच्या घरात राहायचा. मात्र 2015 च्या त्या कथित घटनेनंतर त्याच्या आईने हा गाव सोडला. आपले घर दुसऱ्या कुणाला भाड्याने देऊन ती वेगळीकडे राहायला गेली होती. त्यानंतर ख्रिस काही काळ मुंबईत तर नंतर विदेशात राहून आला होता अशी माहिती प्राप्त झाली आहे.