आनंद वाचासुंदर यांची अखेर उचलबांगडी
By admin | Published: July 26, 2015 02:40 AM2015-07-26T02:40:47+5:302015-07-26T02:40:58+5:30
पणजी : जैका प्रकल्पाचे गोव्यातील प्रकल्प संचालक ए. वाचासुंदर यांची कंत्राट पद्धतीवरील नियुक्ती सरकारने शनिवारी अखेर रद्दबातल केली.
पणजी : जैका प्रकल्पाचे गोव्यातील प्रकल्प संचालक ए. वाचासुंदर यांची कंत्राट पद्धतीवरील नियुक्ती सरकारने शनिवारी अखेर रद्दबातल केली. गुन्हा अन्वेषणकडून (क्राईम ब्रँच) वाचासुंदर यांना अटक केली जाईल, अशी शक्यता आहे.
वाचासुंदर हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंते म्हणून तीन वर्षांपूर्वी सेवेतून निवृत्त झाले होते. नंतर लगेच त्यांची सरकारने गोव्यातील जैकाची कामे पाहण्यासाठी बांधकाम खात्यातीलच जैका विभागात प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती केली होती. लुईस बर्जर या सल्लागार कंपनीने आपण गोव्यातील माजी मंत्री व काही अधिकाऱ्यांना जैकाच्या कामांसाठी लाच दिल्याची माहिती अमेरिकेच्या न्यायालयात गेल्यामुळे गोवा सरकारने पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाला चौकशी करण्यास सांगितले. क्राईम ब्रँचने वाचासुंदर यांची चौकशी चालवली आहे. तसेच जैकाच्या बांधकाम खात्यातील कार्यालयात छापा टाकून काही फाईल्सही जप्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, चौकशीचे काम निष्पक्षपाती व्हावे व त्यात अडथळा येऊ नये म्हणून आम्ही शनिवारी वाचासुंदर यांची नियुक्ती रद्द करणारा आदेश जारी केला. ते बडतर्फ झाले आहेत. (खास प्रतिनिधी)