ओखी वादळाच्या तडाख्यातून सावरलेले शॅक व्यावसायिक नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 12:38 PM2017-12-15T12:38:32+5:302017-12-15T13:20:25+5:30
ओखी चक्रीवादळामुळे शॅक्सचं झालेलं नुकसान विसरुन शॅक व्यवसाय पुन्हा नव्याने उभारी घेऊन नाताळ तसेच नवीन वर्ष गोव्यात साजरे करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
म्हापसा : ओखी चक्रीवादळामुळे शॅक्सचं झालेलं नुकसान विसरुन शॅक व्यवसाय पुन्हा नव्याने उभारी घेऊन नाताळ तसेच नवीन वर्ष गोव्यात साजरे करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. शनिवारच्या विकएण्डपासून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ सुरु होणार आहे. हा ओघ नवीन वर्षाच्या आगमनापर्यंत राहणार आहे.
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला गोव्यासह इतर राज्यातील किनारी भागात धडकलेल्या ओखी चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणावर तडाखा दिला होता. गोव्यात मच्छीमार बांधवा समवेत किनाऱ्यावर उभारण्यात आलेल्या शॅक व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरं जावं लागलं होतं. उत्तर गोव्यात पेडणे तालुक्यात तसेच दक्षिणेतही शॅक्सचं मोठं नुकसान झालं. झालेल्या नुकसानीचा आकडा लाखोंच्या घरात गेला होता. या महिन्यात काही शॅकवर नृत्य रजनीचे आयोजन केले जाते. काही शॅकवर पार्ट्यासुद्धा आयोजित होत असतात. त्यामुळे शॅक धारकांसाठी डिसेंबर महिना हा ऐन कमाईचा महिना असतो. होत असलेल्या कमाईतून झालेल्या नुकसानीतील किमान नुकसानी या महिन्याभरात भरुन काढण्याच्या प्रयत्नात हे व्यवसायिक आहेत.
महिन्याभरात देश विदेशातून लाखोंनी पर्यटक तसेच विदेशात स्थायिक झालेले अनिवासी गोमंतकीय गोव्यात डिसेंबरात होणारा नाताळ सण तसेच त्यानंतर येणारे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी दाखल होत असतात. येणारे हे लोक आपल्या वास्तव्यातील बहुतेक काळ किनाऱ्यावर व्यथित करणे पसंद करीत असतात. आलेले पर्यटक तर जास्त करुन किनारी भागातील हॉटेलातच निवासासाठी राहतात. त्यामुळे शॅकधारकांना त्याचा चांगलाच फायदा होत असतो.
वादळाच्या तडाख्याचा सामना केल्यानंतर उद्भवलेल्या नुकसानीच्या कठीण प्रसंगातून मार्ग काढीत शॅकधारकांनी नव्याने आपल्या शॅकांची उभारणी करण्याचे काम सुरु केले होते. ते जवळ जवळ पूर्ण झाले असून पुन्हा पर्यटकांच्या स्वागतासाठी ते तयार झाले आहेत. ही तयारी करताना बऱ्याच प्रमाणावर दक्षता बाळगण्यात सुद्धा आली आहे. काही शॅकधारकांनी वादळापासून संरक्षणासाठी उपाय योजना सुद्धा केलेल्या आहेत.
शॅक मालक कल्याण समितीचे अध्यक्ष कु्रज कार्दोज यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्नवत अशा प्रकारे आलेल्या ओखी वादळानंतर शॅक व्यवसायीक सावरले असून आपला व्यवसाय पुन्हा नव्या जोमाने सुरु करण्यासाठी सज्ज झाले आहेत. बऱ्याच जणांनी कर्ज काढून व्यवसाय पुर्नजीवीत करण्यात भर दिला असल्याचे कार्दोज म्हणाले.
नुकसानी झालेल्या बऱ्याच शॅक धारकांनी सरकारकडून नुकसान भरपाईची मागणी केली होती. केलेल्या मागणीनुसार सरकारकडे पाठपुरवठा करण्याचे काम सुरु असून त्यासाठी काही शॅकधारकांकडून झालेल्या नुकसानीची विस्तारीत माहिती जमवण्याचे काम सुरु असल्याचे कार्दोज म्हणाले. प्रत्येक शॅकधारकाला त्यासंबंधीची माहिती देण्याच्या सुचना करण्यात आली असल्याचे कार्दोज म्हणाले.