उत्तर गोव्यातून रिंगणात उतरण्यास तयार: समील वळवईकर, इंडिया आघाडीसाठी बोलणी अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2024 02:57 PM2024-02-22T14:57:44+5:302024-02-22T14:58:03+5:30
पक्षाचे प्रदेश संयुक्त निमंत्रक समील वळवईकर यांनी स्पष्ट केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : "इंडिया" युतीने गोव्यात तृणमूल काँग्रेसला लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिल्यास उत्तर गोवा मतदारसंघातून मी रिंगणात उतरण्यास तयार आहे, असे पक्षाचे प्रदेश संयुक्त निमंत्रक समील वळवईकर यांनी स्पष्ट केले आहे.
वळवईकर म्हणाले की, "गोव्यात "इंडिया" युतीबाबत चर्चा अंतिम टप्यात आहे. प्रत्येक पक्षाचे केंद्रीय नेते निर्णय घेतील आणि कुठल्या पक्षाने निवडणूक लढवावी, हे ठरेल." ते पुढे म्हणाले की, "आज भाजपकडे पंतप्रधान पदाचा मोदींसारखा चेहरा असला व त्या पक्षाकडे पैसा व संघटना मजबूत असली तरी वातावरण मात्र भाजपविरोधात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपची मतांची टक्केवारी ३५ टक्के एवढीच होती. ६५ टक्के मते विरोधात आहेत. हे सगळे विरोधक एकत्र आल्यास भाजप उमेदवाराला पराभूत करणे कठीण नाही. विरोधकांच्या या मतांमध्ये फूट पडू नये यासाठी "इंडिया" युतीची गरज आहे. तृणमूल काँग्रेसला संधी दिल्यास मी उत्तर गोव्यातून निवडणूक लढवीन."
दरम्यान, वळवईकर यांनी फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत कुंभारजुवेंतू तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता त्यांनी लोकसभेसाठी रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे.