मासळीच्या आयातीवर बंदीचा फेरविचार करा - मायकल लोबो
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 04:55 PM2018-11-13T16:55:02+5:302018-11-13T16:55:39+5:30
सरकारच्या ब-याच निर्णयावर उघडपणे नाराजी व्यक्त करणारे उपसभापती मायकल लोबो यांनी फॉर्मेलिनच्या प्रश्नावरुन मासळीच्या आयातीवर लागू केलेली बंदीवर फेरविचार करुन त्वरित हटवण्याची मागणी केली आहे.
म्हापसा - सरकारच्या ब-याच निर्णयावर उघडपणे नाराजी व्यक्त करणारे उपसभापती मायकल लोबो यांनी फॉर्मेलिनच्या प्रश्नावरुन मासळीच्या आयातीवर लागू केलेली बंदीवर फेरविचार करुन त्वरित हटवण्याची मागणी केली आहे. तशी मागणी लोबो यांनी आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली असल्याची माहिती लोबो यांनी पत्रकारांना दिली.
राज्यात फॉर्मेलिन असलेल्या मासळीची आयात होवू नये यासाठी आरोग्य मंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय योग्य असून अशा प्रकारच्या मासळीतून लोकांच्या आरोग्याची असलेली चिंता त्यांना दिसून येत असल्याचे म्हणाले, मात्र आयातीवर लागू केलेल्या बंदीमुळे लोकांवर तसेच व्यवसायिकांवर त्याचे विपरीत परिणाम होणार असल्याचे लोबो म्हणाले. पत्रातून केलेल्या मागणी बरोबर त्यांच्याशी आपण स्वत: फोनवर चर्चा केली असून त्यांची भेट घेवून त्यांच्या सोबत चर्चा करणार असल्याचे तसेच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सोबत सुद्धा चर्चा करणार असल्याची माहिती लोबो यांनी यावेळी दिली.
मासळीच्या आयातीवर बंदी लागू करण्यापेक्षा गोव्यातील शेजारील राज्य महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून येणाºया मासळीवर बंदी उठवावी. या भागातून मासळीची आयात करणारे वाहने फक्त दोन तासाच्या अंतरात गोव्यात दाखल होवू शकतात. त्यामुळे मासळीची वाहतूक करण्यासाठी इन्सुलेटेड वाहनाची गरज नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. तामिळनाडू तसेच आंध्र प्रदेशातून येणाºया मासळीवर मात्र बंदी हवी असेही ते ठामपणे म्हणाले. बंदी लागू करण्यापेक्षा अन्न व औषधी प्रशासनाच्या वतिने ठोस उपाय योजना हाती घेणे मासळीची तपासणी करणे गरजेचे आहे. त्या करीता यंत्रणेचा वापर करुन उत्तरेत एक तर दक्षिणेत एका वाहनाचा वापर करुन मासळीची तपासणी करावी. त्यात फॉर्मेलिनची मासळी आढळून आल्यास त्यांना कठोर शासन करावे गरज पडल्यास पोलीस कारवाई सुद्धा करण्यात यावी अशीही मागणी लोबो यांनी केली. तसेच वेळ पडल्यास कायद्यात योग्य तो बदल करण्यासाठी पावले उचलण्याची सुचनाही लोबो यांनी केली.
गोव्यात येणा-या पर्यटकाची किमान ८० टक्के पर्यटक मासळीचे सेवन करण्यासाठी येत असतात. त्यांना चांगली मासळी खाण्यासाठी हवी असते. आयातीवर बंदी लागू केली असल्याने किनारी भागातील हॉटेल्स तसेच शॅक व्यवसायिकांवर त्याचे प्रचंड परिणाम होत असल्याचे तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम होणार असल्याचे सांगितले. त्यांच्यावर व्यवसाय बंद करण्याची पाळी येणार असल्याचे सांगितले. गोव्यात मिळणारी मासळी लहान असल्याने लोकांना व्यवसायिकांना चालत नसल्याची माहिती दिली.
मासळीच्या आयातीवर लागू केलेल्या बंदीमुळे पापलेट, इसवण, सुरमई तसेच इतर मोठ्या प्रकारची मासळी दुर्मीळ होत चालली आहेत. गोव्यातील समुद्रात अशा प्रकारची मासळी मिळणे कठीण असल्याने त्यांची आयात करण्यापेक्षा दुसरा पर्याय नसल्याचे ते म्हणाले. तसेच सध्या मिळत असलेली मासळी गोवेकरांना विकत घेणे परवडण्यासारखी नसल्याची माहिती मायकल लोबो यांनी पत्रकारांना दिली.