गोव्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्यात समेट? वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 07:34 PM2020-07-18T19:34:36+5:302020-07-18T19:35:31+5:30

मुख्यमंत्री शुक्रवारी पुन्हा राज्यपालांना भेटल्याचे वृत्त केवळ लोकमतनेच शनिवारी प्रसिद्ध केले आहे.

Reconciliation between Goa's Governor and Chief Minister? Trying to cover up the controversy | गोव्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्यात समेट? वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

गोव्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्यात समेट? वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

Next

पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे शुक्रवारी पुन्हा सायंकाळी राजभवनवर गेले व राज्यपाल सत्यपाल मलिक यांना ते भेटून आले. राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्यात समेट घडून आल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली. विशेष म्हणजे राज्यपालांच्या कार्यालयातून शनिवारी सकाळी प्रसिद्धी पत्रक जारी केले गेले व मुख्यमंत्र्यांनी कोविड व्यवस्थापनाच्या विषयाबाबत राज्यपालांच्या सूचनांचे पूर्ण पालन केले जाईल अशी ग्वाही दिल्याचे पत्रकाद्वारे जाहीर केले गेले. एकंदरीत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न राजभवनने केल्याचे राजकीय गोटात मानले जात आहे.

मुख्यमंत्री शुक्रवारी पुन्हा राज्यपालांना भेटल्याचे वृत्त केवळ लोकमतनेच शनिवारी प्रसिद्ध केले आहे. त्या भेटीचा तपशील जाहीर झाला नव्हता, तो तपशील मुख्यमंत्री कार्यालयानेही जाहीर केला नव्हता. राज्यपालांच्या सचिवांनी तो पत्रकाद्वारे जाहीर केला. गुरुवारी राज्यपालांनी गोवा सरकारला फटकारले होते. मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्यातील शाब्दीक चकमक लोकांसमोर आली होती. आपण मिडियाला दोष दिलाच नव्हता, मुख्यमंत्र्यांनी उगाच पत्रकारांना तसे सांगितले असे राज्यपाल म्हणाले होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री येऊन भेटल्यानंतर राज्यपाल शांत झाले असे चित्र दिसते. कारण राजभवनवरून जारी झालेल्या प्रसिद्धी पत्रकात पूर्वीच्या वादाचे कोणतेही प्रतिबिंब नाही. कडवटपणा टाळला गेला आहे.

शुक्रवारी मुख्यमंत्री पुन्हा भेटले तेव्हा त्यांची राज्यपालांशी कोविड व्यवस्थापनाबाबत अधिक तपशीलाने चर्चा झाली व राज्यपालांनी कोविडविरोधी लढय़ात सरकारला पूर्ण पाठींबा दिला असल्याचे राजभवनकडून जाहीर करण्यात आले. राज्यपालांची निरीक्षणो व सूचना यावर लवकरच कृती केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली, असेही राज्यपालांच्या सचिवांनी स्पष्ट केले आहे. राज्याच्या हिताच्यादृष्टीने कोविडविरोधी लढा जिंकण्यासाठी पूर्ण समन्वय व सहकार्याची भावना ठेवून काम करण्याचा निर्धार राज्यपाल व मुख्यमंत्री या दोघांनी मिळून केल्याचेही राजभवनने पत्रकात नमूद केले आहे.

Web Title: Reconciliation between Goa's Governor and Chief Minister? Trying to cover up the controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.