'सत्तरी'त विक्रमी मतदान; विश्वजित व दिव्या राणे यांच्या प्रयत्नांना मोठे यश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2024 09:41 AM2024-05-08T09:41:04+5:302024-05-08T09:42:08+5:30

कार्यकर्त्यांमध्ये खुशी

record turnout in sattari for goa lok sabha election 2024 voting big success to the efforts of vishwajit rane and divya rane | 'सत्तरी'त विक्रमी मतदान; विश्वजित व दिव्या राणे यांच्या प्रयत्नांना मोठे यश 

'सत्तरी'त विक्रमी मतदान; विश्वजित व दिव्या राणे यांच्या प्रयत्नांना मोठे यश 

लोकमत न्यूज नेटवर्क, सत्तरी: सत्तरी तालुक्यात मंत्री विश्वजित राणे व आमदार डॉ. दिव्या राणे यांनी मागील दीड महिना खूप प्रचारकाम केले. या तालुक्यात मतदानाचे प्रमाण वाढायलाच हवे, म्हणून मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले. काल सर्वाधिक मतदान सत्तरी तालुक्यात झाल्याचे स्पष्ट झाले आणि तालुक्यातील भाजपमध्ये खुशीची लहर पसरली.

यावेळी वाळपई मतदारसंघात २७ हजार ३१५ लोकांनी मतदान केले. गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त मतदान तिथे झाले. एकूण ३२ हजार ३२५ पैकी २७ हजार ३१५ मतदारांनी मतदान केले, हा विक्रमच आहे, असे मंत्री तथा वाळपईचे आमदार विश्वजित राणे म्हणाले. या मतदारसंघात मुस्लिम मतदारही बरेच आहेत. वाळपई पालिका क्षेत्रात अनेक मुस्लिम मतदार आहेत. त्या सर्वांची स्वतंत्र बैठकही विश्वजित राणे यांनी घेतली होती.

पर्ये मतदारसंघाचे नेतृत्व आमदार दिव्या राणे यांच्याकडे आहे. तिथेही विक्रमी प्रमाणात मतदान झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी दिव्या राणे यांनी चौदा हजार मतांची आघाडी प्राप्त केली होती. या वेळीही मतदान वाढायलाच हवे, म्हणून दिव्या व विश्वजित यांनी खूप बैठका व सभा घेतल्या. यावेळी पर्येत ८८.६१ टक्के मतदान झाल्याने दिव्याने आनंद व्यक्त केला. ३३ हजार ९११ मतदारांपैकी ३० हजार ५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

दोन्ही मतदारसंघातील काही बुथांवर ९८ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. तर बहुतांश बुथांवर सरासरी ८० ते ९० टक्के मतदान झाले आहे. पर्यंत १५ हजार १७६ महिलांनी आणि १४ हजार ८७४ पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. तर वाळपई मतदारसंघात १३ हजार ७४९ महिलांनी आणि १३ हजार ५५७ पुरुषांनी मतदान केले. उसगावसह, खोतोडे, गुळेली, नगरगाव अशा पंचायत क्षेत्रांमध्ये आणि वाळपई पालिका क्षेत्रामध्ये यावेळी जास्त मतदान झाले आहे. या सर्व भागांमध्ये भाजपच्या अनेक सभा, बैठका गेले महिनाभर सुरू होत्या.

 

Web Title: record turnout in sattari for goa lok sabha election 2024 voting big success to the efforts of vishwajit rane and divya rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.