भरती आयोगाचा 'श्री गणेशा'; राज्यातील दोन केंद्रांवर झाली पहिली परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2024 07:39 AM2024-02-26T07:39:55+5:302024-02-26T07:40:53+5:30
लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काही पदांसाठी शक्य तेवढी प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्य कर्मचारी निवड आयोगाकडून वेगवेगळ्या खात्यांमध्ये भरतीसाठी पहिली परीक्षा काल, रविवारी दोन केंद्रांवर झाली. लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काही पदांसाठी शक्य तेवढी प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
फातोर्डा येथील डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच आसगाव येथील फादर आग्नेल इन्स्टिट्यूटमध्ये काल दिवसभरात चार सत्रांमध्ये या परीक्षा घेण्यात आल्या. राज्य कर्मचारी निवड आयोगाचे सदस्य दौलतराव हवालदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या. आता दर महिन्याला परीक्षा घेतल्या जातील, असे त्यांनी सांगितले. आतापर्यंत भरतीसाठी आयोगाकडून दोन जाहिराती प्रसिध्द झाल्या. त्यानुसार उच्च शिक्षण खात्यासाठी लायब्ररीयन ग्रेड-वन आणि ग्रेड-टू अशा १६ पदांसाठी, माध्यमिक विद्यायलांमध्ये ७ चित्रकला शिक्षक, पोलिस दलात साहाय्यक उपनिरीक्षक व लॅब टॅक्निशियन, म्युझियम खात्यात साहाय्यक कंझर्वेटर, बंदर कप्तान खात्यात लाइट हाउस कीपर आदी पदांसाठी काल परीक्षा झाल्या.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, वीज, शिक्षण आदी खात्यांमध्ये विविध वर्गवारीत भरतीसाठी रिक्त पदांची यादी तयार आहे. यापुढे कर्मचारी निवड आयोगच भरती करणार असल्याने ती पारदर्शक पध्दतीने होईल व मंत्र्यांच्या वशिलेबाजीला वाव राहणार नाही.
काय आहे सीबीटी?
सीबीटी परीक्षा ही संगणक आधारीत परीक्षा आहे. उमेदवाराची कामगिरी, कौशल्य किंवा क्षमता यांचे मूल्यांकन किवा विश्लेषण केले जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनारक्षित वर्गवारीत उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. तर ओबीसी/दिव्यांगांनी किमान ४० टक्के व एससी, एसटी उमेदवारांनी ३५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
भरतीच्या आणखी जाहिराती निघणार
आचारसंहिता लागू होण्याआधी भरतीसाठी आणखी काही पदांसाठी जाहिराती प्रसिध्द केल्या जाण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये कनिष्ठ लिपीक (एलडीसी), मल्टिटास्कींग कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या पदांसाठी एकत्रच जाहिरात दिली जाणार आहे. येत्या आठवड्यात जाहिराती प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. प्राथमिक शाळांमध्ये प्रशिक्षित इंग्रजी शिक्षकांच्या ३६ पदांसाठी, वाहतूक खात्यात नेटवर्क इंजिनियर आदी पदेही जाहीर झालेली आहेत. या पदांसाठी कालांतराने परीक्षा होतील.