'कदंब'मध्ये ९० चालक, ७२ वाहक पदांसह १७६ जागांवर भरती; लवकरच १०० इलेक्ट्रिक बसगाड्या
By किशोर कुबल | Published: November 2, 2023 06:00 PM2023-11-02T18:00:48+5:302023-11-02T18:01:45+5:30
अर्ज मागवले : लवकरच १०० नव्या इलेक्ट्रिक बसगाड्या ; ३० ते ४० मार्गांवर धावणार
पणजी : कदंब वाहतूक महामंडळाने ९० चालक व ७२ वाहक यांच्यासह एकूण १७६ पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. चालक, वाहकांची मिळून १६२ पदे रोजंदारीवर आहेत. भरल्या जाणार्या अन्य पदांमध्ये सहाय्यक वाहतूक निरीक्षक (३), सहाय्यक स्टोअर कीपर (१), सुरक्षा सहाय्यक (३), सहाय्यक डेटा एन्ट्री ऑपरेटर (१०) या पदांचा समावेश आहे.
चालक वगळता इतर पदांसाठी येत्या १० तारीखपर्यंत अर्ज करता येतील. चालक पदांसाठी ९ रोजी सकाळी १० वाजता पर्वरी येथे कदंब महामंडळाच्या मध्यवर्ती वर्कशॉप मध्ये शारीरिक चाचणी होईल. त्याच दिवशी त्यांचे अर्ज स्वीकारले जातील, असे व्यवस्थापकीय संचालक डेरीक नेटो परैरा यांनी म्हटले आहे. चालक तसेच वाहकपदांची संख्या आणखी वाढू शकते असे त्यांनी म्हटले आहे. कदंब महामंडळात गेली अनेक वर्षे भरती झाली नव्हती. त्यामुळे अडचण येत होती. काही बदली चालकांची सेवेत कायम करण्याची ही मागणी आहे. कदंब आता खाजगी बसेस भाडेतत्त्वावर सेवेत घेणार आहे शिवाय इलेक्ट्रिक बसेस व अन्य मिळून ताफ्यात बसगाड्यांची संख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे चालक वाहकांची गरज भासणार आहे.