प्रादेशिक पक्षांनी एकत्र यावे
By admin | Published: July 30, 2016 02:49 AM2016-07-30T02:49:54+5:302016-07-30T02:51:10+5:30
मडगाव : सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन आगामी निवडणूक लढवावी, असे आवाहन युगोडेपाने केले आहे. शुक्रवारी मडगावात
मडगाव : सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन आगामी निवडणूक लढवावी, असे आवाहन युगोडेपाने केले आहे. शुक्रवारी मडगावात या पक्षाची आमसभा झाली. भाजपा व काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकविण्यासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक पक्षांनी एका झेंड्याखाली येण्याची गरज असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. प्रादेशिक पक्षच गोव्याचे हित सांभाळू शकतो, असेही या वेळी युगोडेपाच्या नेत्यांनी सांगितले.
युगोडेपाचे महासचिव आनाक्लेत व्हिएगस यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यापूर्वी अनेक नेते युगोडेपामध्ये आले व आपला स्वार्थ सांभाळल्यानंतर पक्षाला सोडचिठ्ठी देऊन गेले. भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी गोव्याची वाट लावली आहे. गोवेकर व राज्याचे हित सांभाळण्यासाठी प्रादेशिक पक्षांनी एकत्र येणे ही आज खरी गरज असल्याचे ते म्हणाले. या पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी आपण युगोडेपाचे उपाध्यक्ष राधाराव ग्रासियस यांच्यावर सोपवितो, असेही ते म्हणाले.
उपाध्यक्ष राधाराव ग्रासियस यांनी आज सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले. भाजपाकडून जनतेच्या बऱ्याचा आशा होत्या. मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभूत केल्यानंतर जनता खुश झाली होती. मात्र, भाजपानेही गोवेकरांचा भ्रमनिरास केला आहे, असे ते म्हणाले. गोवेकरांनी पोर्तुगीज पासपोर्ट मिळाल्यानंतर भारतीय पासपोर्ट परत करू नये, असेही आवाहन त्यांनी केले. तो गोवेकरांचा हक्क आहे. कायद्याने काही अडचणी असल्यास न्यायालय त्यावर निर्णय देईल, तोपर्यंत पासपोर्ट परत का करावा, असा सवालही त्यांनी व्यक्त केला.
युगोडेपाचे अध्यक्ष डॉ. जर्सन फर्नांडिस यांनी गोव्याचा विकास खुंटला असल्याचे सांगितले. शाश्वत विकासाची आज गरज आहे. माध्यमप्रश्नावर उगाच बाऊ केला जात आहे. हा प्रश्न शिक्षकांवर सोपवावा. राईट टू एज्युकेशन हक्कामुळे मुलांना आपल्याला पाहिजे त्या भाषेत शिक्षण घेण्याची मुभा आहे. अनुदान व माध्यम याचा घोळ घालू नये, हे दोन्ही विषय भिन्न असल्याचे ते म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून गावागावांत बैठका घेण्याचा निणर्यही युगोडेपाच्या या आमसभेत घेण्यात आला. (प्रतिनिधी)