१ लाख ८० हजार मुलांची ‘आधार’साठी नोंदणी

By admin | Published: July 9, 2017 02:43 AM2017-07-09T02:43:48+5:302017-07-09T02:44:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : राज्यातील पहिलीपासून बारावी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार कार्डसाठी नावनोंदणी करून घेण्याची मोहीम शिक्षण खात्याने हाती

Registration for 'Aadhaar' of 1.80 lakh children | १ लाख ८० हजार मुलांची ‘आधार’साठी नोंदणी

१ लाख ८० हजार मुलांची ‘आधार’साठी नोंदणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : राज्यातील पहिलीपासून बारावी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार कार्डसाठी नावनोंदणी करून घेण्याची मोहीम शिक्षण खात्याने हाती घेतलेलीच आहे. त्या मोहिमेंतर्गत आतापर्यंत १ लाख ८० हजार विद्यार्थ्यांची नावे आधार कार्डसाठी नोंद झाली आहेत. अजून सुमारे दहा हजार विद्यार्थी नावनोंदणीविना उरले आहेत व यास जीईएल तसेच नियोजन व सांख्यिकी खात्याची अनास्था कारण ठरत आहे.
जीईएल यंत्रणेकडे कमी वेळेत सर्व विद्यार्थ्यांची नावनोंदणी करता येईल अशी पुरेशी सामग्रीच नाही. शिक्षण खात्याने जीईएल आणि नियोजन व सांख्यिकी खात्याकडे किट्स मागितले तर किट्स देखील खात्याला मिळाले नाहीत. ३०-४० किट्स दिल्यास आपण स्वत:च विद्यार्थ्यांची नावनोंदणी आधार कार्डसाठी करून घेतो, असे खात्याच्या अधिकाऱ्यांनी जीईएलला सांगितले; पण सध्या आवश्यक सामग्रीसाठी निविदा जारी केली आहे एवढेच खात्याला सांगण्यात आले. यामुळे आधार कार्डसाठी नावनोंदणीची मोहीम संथ झाली आहे. अन्यथा १०० टक्के विद्यार्थ्यांची नावनोंदणी आतापर्यंत झाली असती, असे शिक्षण खात्याच्या काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
अनेक विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची नावनोंदणी करण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षक सक्रिय बनले आहेत. पालकांनीही मुलांची नावे आधार कार्डसाठी नोंद करण्याच्या प्रक्रियेत रस घेतला आहे; पण जीईएलकडून शिक्षण खात्याला आवश्यक सामग्री लवकर मिळत नसल्याने अनेक विद्यालयांचे काम अडले आहे. पंधरा दिवसांत १०० टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी आधार कार्डसाठी करण्याचे लक्ष्य शिक्षण खात्याने समोर ठेवलेले असले तरी, ते गाठता येणार नाही असे आता सध्याची स्थिती पाहता दिसून येते.

Web Title: Registration for 'Aadhaar' of 1.80 lakh children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.