विहिरी आणि पाण्याच्या टँकर्सची नोंदणी 30 दिवसांत करणे सक्तीचे, नोटीस जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 12:50 PM2018-12-05T12:50:03+5:302018-12-05T12:53:26+5:30
उत्तर गोवा जिल्ह्यातील रहिवाशांनी त्यांच्या विहिरी, बोअर वेल्स, संक वेल्स आणि त्यांच्याकडील पाण्याचे टँकर्स यांची नोंदणी सरकार दरबारी येत्या 30 दिवसांत करणे सरकारच्या जलसंसाधन खात्याने सक्तीचे केले आहे.
पणजी - उत्तर गोवा जिल्ह्यातील रहिवाशांनी त्यांच्या विहिरी, बोअर वेल्स, संक वेल्स आणि त्यांच्याकडील पाण्याचे टँकर्स यांची नोंदणी सरकार दरबारी येत्या 30 दिवसांत करणे सरकारच्या जलसंसाधन खात्याने सक्तीचे केले आहे. याबाबतची सार्वजनिक नोटीस जलसंसाधन खात्याच्या कार्यकारी अभियंता कार्यालयातील भू-जल अधिकाऱ्यांनी बुधवारी जारी केली आहे.
तिसवाडी, बार्देश, डिचोली, सत्तरी आणि पेडणे या तालुक्यातील रहिवाशांना ही नोटीस लागू होते. या पाच तालुक्यांमध्ये सुमारे साडेसात लाख लोकसंख्या आहे. गोवा भू-जल नियमन कायद्यांतर्गत लोकांनी विहिरी, बोअर वेल्स, टय़ूब वेल्स यांची नोंदणी जलसंसाधन खात्याकडे करणो गरजेचे ठरते. मात्र लोक नोंदणी करत नाहीत. अनेकांनी जुन्या विहिरींचा वापर करणे सोडून दिले आहे. ग्रामीण भागात काही विहिरींचा वापर अजून होतो. मात्र नव्या बोअर वेल्स वगैरे खोदल्या जात आहेत. नवे बांधकाम करताना अनेक ठिकाणी बोअर वेल्स खोदल्या जातात. शेती कामासाठीही अशा विहिरींची गरज पडते.
जलसंसाधन खात्याने अशा सर्व विहिरींची आता सक्तीने नोंदणी करून घेण्याचे ठरवले आहे. तिसवाडीसाठी पर्वरीत, बार्देशसाठी म्हापसा येथे, डिचोली तालुक्यासाठी डिचोलीत, सत्तरी तालुक्यासाठी वाळपई येथे तर पेडणे तालुक्यातील रहिवाशांसाठी पेडणे येथील सहाय्यक अभियंत्यांच्या कार्यालयात नोंदणी अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. जलसंसाधन खात्याने जारी केलेली सार्वजनिक नोटीस ही 30 नोव्हेंबर 2018 पासून लागू होत आहे.
अनेक लोक टँकरद्वारे पाण्याची वाहतूक करतात. त्यांचा तो व्यवसायच आहे. अशा लोकांनीही टँकरची नोंदणी जलसंसाधन खात्याकडे करणो गरजेचे आहे, असे नोटीशीत म्हटले आहे. सिंक वेल खोदण्यासाठी ज्या ड्रिलींग यंत्रचा वापर केला जातो, त्या यंत्रची व ते यंत्र हाताळणाऱ्या एजन्सीची पत्त्यासह जलसंसाधन खात्याकडे नोंदणी करणो आवश्यक ठरते. त्याविषयीही नोटीशीत सरकारने तपशीलाने उल्लेख केला आहे.