विस्थापितांचे पुनर्वसन करा
By admin | Published: April 20, 2015 01:34 AM2015-04-20T01:34:56+5:302015-04-20T01:35:06+5:30
वास्को : बायणा समुद्रकिनाऱ्याचा विकास किंवा राष्ट्रीय महामार्गाला आमचा विरोध नसून विकासासाठीच विस्थापित होणाऱ्या रहिवाशांचे
वास्को : बायणा समुद्रकिनाऱ्याचा विकास किंवा राष्ट्रीय महामार्गाला आमचा विरोध नसून विकासासाठीच विस्थापित होणाऱ्या रहिवाशांचे सरकारने पुनर्वसन करावे, अशी मागणी बायणा येथील विस्थापित होणाऱ्या रहिवाशांनी पत्रकार परिषदेत केली.
काटेबायणा येथील मच्छीमार समाजाच्या नेत्या कारिदाद परेरा यांच्या नेतृत्वाखाली ही पत्रपरिषद घेण्यात आली. या वेळी प्रकाश राठोड, नझिमा खान आदी उपस्थित होते. या वेळी कारिदाद परेरा यांनी आम्ही या ठिकाणी पोर्तुगीज काळापासून मच्छीमारी व्यवसाय करीत असून येथील काही रहिवासी पन्नास वर्षांपासून स्थायिक झालेले आहेत. यातील काही लोकांचे जन्मही येथेच झाले असल्याने ते जाती-धर्माने जरी परप्रांतीय असले तरी कायद्याने गोव्याचे नागरिकच आहेत. त्यांची घरे जरी बेकायदेशीर असली तरी सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. सरकारने आपली विकासकामे करताना कुणाच्याही पोटावर येऊ नये किंवा त्यांना बेघर करू नये, असे त्यांनी सांगितले. वर्षभर न्यायालयीन पाठपुरावा का केला नाही, असे विचारले असता न्यायालयीन लढा देण्यासाठी निवडलेल्या वकिलांनीच विश्वासघात केला, असे त्यांनी सांगितले. गेल्या निवडणुकीत आमदार मिलिंद नाईक यांनी घरे कायदेशीर करून देण्याचे आश्वासन दिले होते आणि आता त्यांनी यू-टर्न घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)