वाढत्या कोरोना रुग्णांमुळे गोव्यात सोमवारपासून धार्मिक स्थळे खुली होण्याची शक्यता कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 09:04 PM2020-06-06T21:04:57+5:302020-06-06T21:05:18+5:30
गोव्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; आज २०० हून अधिक रुग्ण सापडले
मडगाव: सोमवारपासून राज्यातील धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला असला तरी गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने बहुतेक धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचीच शक्यता व्यक्त केली जात आहे. बहुतेक मंदिर समित्यांचा कल तसाच दिसत आहे. गोव्यातील मशिदी 30 जून पर्यंत बंद राहणार आहेत तर चर्च उघडण्या संदर्भात सरकारी निर्णयानंतर निर्णय घेणार असल्याचे चर्च संस्थेने सांगितले आहे.
गोव्यात मंदिरात भाविकांबरोबरच पर्यटकही मोठ्या संख्येने येत असतात. देशात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर ही मंदिरे लोकांसाठी बंद करण्यात आली होती. आता ती पुन्हा सुरू करण्याची मंदिर समित्यांची सध्या तरी तयारी नाही. कवळे फोंडा येथील प्रसिद्ध शांतादुर्गा देवस्थानाच्या समितीची शनिवारी बैठक होऊन 30 जूनपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
फातरपा येथील प्रसिद्ध शांतादुर्गा कुंकळीकारीण देवस्थानाचे अध्यक्ष नितीन देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्यातरी हे मंदीर भाविकांसाठी उघडणार नसून राज्यातील स्थितीचा आढावा घेऊन पुढच्या रविवारी काय तो निर्णय घेण्याचे समितीने ठरविले आहे. जवळच्या शांतादुर्गा फातरपेकरीण देवस्थानाचे अध्यक्ष दिलखूष देसाई यांनीही मंदिर खुले करण्या संदर्भात कोणताही निर्णय अद्याप झाला नसल्याचे सांगितले. कोणकोणच्या प्रसिद्ध मल्लिकार्जुन देवस्थानात सोमवारपासून भाविकांना केवळ देवदर्शन घेता येणार आहे पण प्रदक्षिणा आणि तीर्थ प्राशनासह कोणतेही विधी करता येणार नसल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी सांगितले.
गोव्यात सर्वात जास्त मंदिरे फोंडा परिसरात असून या परिसरातील सहा मंदिर समित्यांची उद्या रविवारी सकाळी महत्वपूर्ण बैठक म्हार्दोळच्या प्रसिद्ध म्हाळसा मंदिरात होणार आहे. या बैठकीत फोंडा परिसरात असलेल्या म्हाळसा, रामनाथ, नागेश, महालक्ष्मी, देवकीकृष्ण आणि कामाक्षी या मंदिरातील समिती अध्यक्षासह जांबावली येथील श्री रामनाथ दामोदर देवस्थानाचे प्रतिनिधी भाग घेणार आहेत. मंदिरे भाविकांसाठी खुली करायची की नाही याचा निर्णय घेणार आहेत. यापूर्वी वैष्णव सारस्वत समाजाचे मुख्य पिठाधिश विद्याधिराज स्वामी यांनी यापूर्वी आपल्या पिठाच्या अखत्यारीतल्या सर्व मंदिरांना डिसेंम्बर पर्यंत धार्मिक उत्सव आणि अन्नसंतर्पणे बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.
चर्च व मशिदीही बंदच असणार
शासनाने सोमवार पासून धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी दिली असली तरी सध्याच्या स्थितीत चर्चही काही काळ भाविकांसाठी बंदच राहणार अशी माहिती मिळाली आहे. सरकारची मार्गदर्शक तत्वे आल्यानंतरच चर्च निर्णय घेणार असल्याचे ठरविले आहे.
अखिल गोवा मुस्लिम जमात संघटनेनेही 30 जूनपर्यंत गोव्यातील सर्व मशिदी बंद राहणार असल्याचे कळविले आहे. तोपर्यंत नित्याचे 5 नमाज आणि शुक्रवारचा नमाज घरीच अदा करण्याचे आवाहन केले आहे.