नातू आणि सून काढतेय मनोहर पर्रीकरांची आठवण; उत्पल पर्रीकर यांनी दिला आठवणींना उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 02:31 AM2019-12-13T02:31:44+5:302019-12-13T02:43:37+5:30
माझा मुलगा ध्रुव याला माझे वडील तथा ध्रुवचे आजोबा स्व. मनोहर पर्रीकर यांनी खूप लळा लावला होता.
- सदगुरू पाटील
पणजी : माझा मुलगा ध्रुव याला माझे वडील तथा ध्रुवचे आजोबा स्व. मनोहर पर्रीकर यांनी खूप लळा लावला होता. त्यांनी व्यस्त जीवनातूनही वेळ काढून नातवाला प्रेम दिले होते. आता भाई जाऊन साडेआठ महिने झाले; पण रोज मुलगा आठवण काढतोय. शाळेत जाताना व शाळेतून घरी आल्यानंतर ध्रुव रोज घरातील भाईंच्या फोटोला नमस्कार करतोय, अशा शब्दांत उत्पल पर्रीकर यांनी खास ‘लोकमत’कडे आपल्या आठवणी गुरुवारी जागविल्या.
माझी पत्नी रोज सकाळी पाच किंवा साडेपाचला उठते. पूर्वीही जेव्हा ती उठायची तेव्हा भाई जागे आहेत व सरकारी फाइल्स तपासत बसले आहेत असे चित्र तिला साडेपाचच्या सुमारास दिसायचे. मग ती त्यांना चहा द्यायची. त्यामुळे तिला रोज सकाळी उठली की, प्रथम भार्इंना चहा देण्याची सवय झाली होती. आता पहाटे उठल्यानंतर भाई घरात नाहीत हे तिला अनुभवास येते.
माझा मुलगा ध्रुव यास भार्इंनी खेळणी आणली होती. ती खेळणी घेऊन तो खेळतो. कधी घरातील गप्पागोष्टींवेळी तर कधी घराबाहेरील चर्चेमुळे किंवा एखाद्या घटनेमुळे ही आठवण जागी होते. गेल्या दि. १८ नोव्हेंबरला माझा वाढदिवस होता. यावर्षी वाढदिवस साजरा करायचा नाही, फक्त कुटुंबासोबत सायंकाळ घालवायची एवढेच मी ठरविले होते. त्यामुळे वाढदिवशी मी सकाळी नेहमीप्रमाणे माझ्या फॅक्टरीमध्ये गेलो.
मात्र, भाजपच्या पणजीतील कार्यकर्त्यांनी मला फोन केला. तुम्ही सायंकाळी पणजीतील महालक्ष्मी मंदिरात यायलाच हवे, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. शेवटी मी तिथे गेलो व सायंकाळी भार्इंच्या मोठ्या कुटुंबासोबत माझा वाढदिवस साजरा झाला. भाजप कार्यकर्ते म्हणजे भार्इंचे मोठे कुटुंबच आहे, असे उत्पल म्हणाले. भाई नसले तरी, गोवाभरातील भाजप कार्यकर्त्यांशी माझे भावनिक नाते आहे व ते नाते गेल्या साडेआठ महिन्यांतही वाढत गेले, असे उत्पल म्हणाले.
भाई जर आज असते तर केंद्राचे नागरिकत्व विधेयक, काश्मीरप्रश्नी मोदी सरकारने घेतलेला निर्णय व अयोध्याप्रश्नी झालेला न्यायालयीन निवाडा हे पाहून त्यांचे मन समाधानाने भरून आले असते, असे उत्पल यांनी नमूद केले.
--------