रिमोट कंट्रोलचे काम संघाचे नाही; देशातील विविधता हा हिंदू राष्ट्राचा अलंकार- मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 09:47 AM2023-01-09T09:47:52+5:302023-01-09T09:50:02+5:30
पणजीत शनिवारी आयोजित एका सभेत त्यांनी सांगितले की, देशातील विविधता हा शाप नव्हे तर अलंकार आहे.
पणजी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे रिमोट कंट्रोल असल्याचे काहीजण म्हणतात. संघाकडे कुणाचाही रिमोट कंट्रोल नाही आणि संघही कुणाच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाही. संघ स्वयंसेवक घडवितो. ते स्वयंसेवक आपल्याला अनुकूल त्या क्षेत्रात सामाजिक योगदान देत असतात, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
पणजीत शनिवारी आयोजित एका सभेत त्यांनी सांगितले की, देशातील विविधता हा शाप नव्हे तर अलंकार आहे. पंथ व पूजा पद्धती वेगळी असली तरी सर्वांचा डीएनए एक आहे. त्यामुळे या सर्वांसह हे हिंदू राष्ट्र आहे.या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे आदी मान्यवर संघाच्या गणवेशात आले होते.
संघात मर्जीने या, मर्जीने जा...
मोहन भागवत यांनी सांगितले की, रा. स्व. संघ काय आहे, हे समजून घेताना या संघटनेपासून दूर राहून एकच बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करू नका. संघ समजून घ्यायचा असेल तर स्वत:च्या मर्जीने संघात या. तिथे येऊन संघ पाहा. संघ पटला तर स्वत:च्या मर्जीने संघात राहा आणि संघ पटला नाही तर स्वत:च्या मर्जीने संघ सोडून जा, असा सल्ला सरसंघचालकांनी दिला.