विकृती काढून समाजात मानवता वाढवूया
By admin | Published: March 1, 2015 02:26 AM2015-03-01T02:26:00+5:302015-03-01T02:31:45+5:30
फोंडा : प्रणाम सागर एक फुलाची पाकळी होऊन गोवा एक संस्कारक्षम राज्य होण्यासाठी बीजारोपण करण्यासाठी आले असून गोवा एक सुंदर संस्कारक्षम राज्य करूनच जाणार आहेत,
फोंडा : प्रणाम सागर एक फुलाची पाकळी होऊन गोवा एक संस्कारक्षम राज्य होण्यासाठी बीजारोपण करण्यासाठी आले असून गोवा एक सुंदर संस्कारक्षम राज्य करूनच जाणार आहेत, असे प्रतिपादन जैन धर्माचे डॉ. मुनीश्री प्रणाम सागरजी महाराज यांनी शनिवारी येथे केले. समाजातील विकृती काढून टाकण्याचे आणि मानवता वाढविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जैन धर्माचे प्रणाम सागर महाराज यांचे बिहार येथून चेन्नई, पाँडिचेरी, बंगळुरू, धर्मस्थळ, कारकल या भागातून गोव्यात आगमन झाले आहे. फोंडा जैन मंडळ व गोवा जैन मंडळ याच्यातर्फे चंद्रकांत भोजे पाटील यांनी आयोजिलेल्या कुर्टी-फोंडा येथील प्रवचन सभेत ते बोलत होते.
ते म्हणाले की, मी दिगंबर बनूनच इकडे आलोय तो सर्व संप्रदायातील लोकांना एकत्र करून भक्तीच्या मार्गावर पोहचविण्यासाठी. मी प्रकृतीबरोबर चालणारा माणूस. समाजातील विकृती काढून टाकायला पाहिजे. माझे एकच घोषवाक्य आहे तेही ‘मानवता.’ जसे सागरात कितीही घाण टाकली तरीही सागर गलिच्छ होत नाही तसेच हा सागर कुठल्याही संप्रदायाचा नाही. तो एक संत बनून सर्वांना एकत्र करून परमात्म्याला भेटायला घेऊन जायला आलाय.
ते म्हणाले की, गोव्यात जैन संत म्हणून पहिल्यांदाच आपण आलो आहे. यापूर्वी कुणी तसा आला नव्हता. गोव्यात भगवान महावीर उद्यान आहे, ही चांगली गोष्ट आहे. हे उद्यान महावीरांच्या नावाने मुद्दाम तयार करण्यात आले आहे; कारण सर्व पशुपक्षी त्यामध्ये गुण्यागोविंदाने नांदत असतात. जसे वाघ आणि गाय एकत्र येऊन पाणी पितात, तसेच गोव्यातील लोक एकत्र राहातात. गोव्यात नक्षत्र उद्यान व्हायला हवे. गोव्यातील लोक चिंतेत असतात. त्या उद्यानात गेल्यावर सर्वांची चिंता मिटेल. त्यामुळे गोव्यात आयुर्वेदिक औषधे मिळतात, असे बाहेरील राज्यातील लोकांना वाटेल. मग लोक समुद्रावर न जाता त्या नक्षत्र उद्यानात आपली चिंता मिटविण्यासाठी येऊ लागतील.
मुनींच्या तीन निशाणी आहेत. मोर, कमळ आणि वाघ, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, महावीर म्हणजे म-मुस्लीम, ह-हिंदू, वी-सिख, र-इसाई. जैन समाज या सगळ्यांना एकत्र करतो व एक भारत निर्माण करण्याचा व एकतेचा संदेश देतो.
ते म्हणाले, गोव्यात धन खूप आहे; पण ते सांभाळणारे मरण, आत्महत्या असल्या विचारात गुंतलेले असतात. एक आई जेव्हा मुलाला कुराण वाचून दाखवते तेव्हा तो आपण मुस्लिम समजतो. जेव्हा गायत्री मंत्र म्हणते, तेव्हा तो आपण हिंदू समजतो. जेव्हा मुलगा मोठा होतो तेव्हा तो मंत्र विसरतो आणि धनाच्या लालसेत राहातो. मग तो डॉक्टर, इंजिनिअर होणार, असे सांगतो; पण मी हिंदू म्हणून सांगत नाही. आई मुलांना संस्कार देते; पण ती लहानपणीच त्यांना सांगते की,
तू डॉक्टर, इंजिनिअर हो.
मोठेपणी मुलाच्या मनात तेच विचार घोळत राहातात व तो धनाच्या मागे लागतो.
माणूस जन्मापासून बनत नाही, तर तो कर्मापासून बनतो. संस्कारच त्याची जडणघडण करतात. मी प्राकृतिक संघर्षातून आलो आहे. मी ड्रेस घालत नाही. जर मी भगवे कपडे घातले, तर हिंदूच माझ्याकडे येणार, हिरवे घातले तर मुस्लिम येणार व पांढरे घातले तर सिख, इसाईच येणार म्हणून मला कुठल्याच धर्मात अडकून पडायचे नाही, असे ते म्हणाले.
सुरुवातीला शनिवारी सकाळी ९ वाजता कुर्टी येथील सावित्री सभागृहाजवळून प्रणाम सागर महाराज यांची मिरवणूक निघून ही शोभायात्रा कुर्टी येथील कामाक्षी उच्च माध्यमिक विद्यालयाजवळ पोचल्यानंतर तेथे उभारण्यात आलेल्या शामियान्यात सर्व संप्रदायाकडून मंगल आशीर्वाद स्वीकारण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता प्रणाम सागर महाराज यांचा सत्संगाचा व प्रवचनाचा कार्यक्रम झाला. जैन धर्माचे गुरू असलेले प्रणाम सागर महाराज यांचे पहिल्यांदाच गोव्यात आगमन होत असल्याने त्यांचे जय्यत स्वागत करण्यात आले.
(वार्ताहर)