गोव्यात स्पासाठी परवान्यांचे नूतनीकरण तूर्त बंद, आरोग्य कायदा बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 01:07 PM2019-02-01T13:07:09+5:302019-02-01T13:14:49+5:30
गोव्यात स्पासाठी परवान्यांचे नूतनीकरण तूर्त थांबविण्यात आले आहे. केवळ दहा किंवा वीस चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत स्पा सुरू केले जातात.
पणजी - गोव्यात स्पासाठी परवान्यांचे नूतनीकरण तूर्त थांबविण्यात आले आहे. केवळ दहा किंवा वीस चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत स्पा सुरू केले जातात. ते बंद केले जाईल, तसेच गोव्याचा सार्वजनिक आरोग्य कायदाही बदलला जाईल, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शुक्रवारी जाहीर केले.
गोव्यातील शालेय मुलांमध्ये मधूमेहाविषयी जागृती करण्याच्या हेतूने सरकारच्या आरोग्य खात्याने शुक्रवारी सेनोफी कंपनीसोबत समझोता करार केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री राणे म्हणाले, की गोव्यातील 15 टक्के लोकसंख्येला मधूमेहाची लागण झालेली आहे. मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलणे व त्यासाठी मुलांमध्ये जागृती करणे गरजेचे बनले आहे. मुलांना स्कुल कँटीनमधून जे खाद्य दिले जाते, त्याची व्याख्याही बदलली जाईल. त्यासाठी गोवा आरोग्य सेवा कायदा अधिक दुरुस्त व मजबूत केला जाईल. सध्याचा कायदा हा कालबाह्य झालेला आहे.
मंत्री राणे म्हणाले, की राज्यातील सर्व रेस्टॉरंट्स आणि स्पा यांच्या परवान्यांचे नूतनीकरण थांबविण्याचे व त्यांना ना हरकत दाखले देणे बंद करण्याचे आदेश आपण आरोग्य खात्याला दिले होते. त्यानुसार महिनाभर आम्ही परवाने देणो थांबविले. आता रेस्टॉरंट्ससाठी परवाने दिले जातील पण रेसिडन्शीअल वसाहतींमध्ये रेस्टॉरंट सुरू करू दिले जाणार नाही. स्पांसाठी ना हरकत दाखले देणे तर बंदच ठेवले आहे. कारण अनेक ठिकाणी 10 ते 20 चौरस मीटर क्षेत्रफळात स्पा सुरू केला जातो. बाहेर एक बाऊन्सर ठेवला जातो. आत काय चाललेय ते कुणाला कळत नाही. हे प्रकार बंद केले जातील. मंत्री राणे म्हणाले, की आरोग्य कायद्यात दुरुस्त्या करताना अन्न व औषध प्रशासन खाते आणि शिक्षण खात्याला चर्चेमध्ये सामावून घेतले जाईल.