अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By काशिराम म्हांबरे | Published: June 15, 2023 10:12 PM2023-06-15T22:12:20+5:302023-06-15T22:12:32+5:30
संशयित व पीडितेला म्हापसा पोलीस स्थानकात आणल्यानंतर भादंसंच्या ३६३ व गोवा बाल कायदा कलम ८ अंतर्गत गुन्ह्याखाली नागेश कोलकर यास रितसर अटक केली.
म्हापसा - म्हापसा येथील लक्ष्मीनगरातून १४ वर्षीय मुलीचे फुस लावून पळवून नेलेल्या मुलीची पोलिसांनी इटगी बिजापूरमधून सुखरूप सुटका केली. याप्रकरणी संशयित आरोपी नागेश उर्फ संजू लालसाब कोलकर (२३, रा. लक्ष्मीनगर व मूळ बिजापूर) यास अटक केली.
हा अपहरणाचा कथित प्रकार गेल्या १० जून रोजी घडला होता. पीडितेच्या आईने त्याच दिवशी दुपारी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपीविरूध्द गुन्हा नोंद करुन घेतला होता.
संशयित पीडित अल्पवयीन मुलीला घेऊन आपल्या मूळ गावी व्यंकटेश्वरनगर, बासवन, बिजापूर-कर्नाटक येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार म्हापसा पोलीस पथक कर्नाटकला रवाना झाले. मात्र संशयित आपल्या घरी नव्हता. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत संशयिताने पीडितेला इटगी बिजापूर येथे ठेवल्याची माहिती मिळाली. बुधवारी १४ जून रोजी पोलिसांनी तेथे जाऊन संशयिताला पकडले व पीडितेची सुटका केली.
संशयित व पीडितेला म्हापसा पोलीस स्थानकात आणल्यानंतर भादंसंच्या ३६३ व गोवा बाल कायदा कलम ८ अंतर्गत गुन्ह्याखाली नागेश कोलकर यास रितसर अटक केली. संशयिताला म्हापसा न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, पीडितेची गोमेकॉमध्ये वैद्यकीय तपासणी केली आहे. या तपासणीचा अहवाल आल्यावर अजून गुन्ह्याखालील आवश्यक कलमे जोडण्यात येणार आहेत. पोलीस निरीक्षक सिताकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाबलो परब, रिचा भोंसले, यशवंत मांद्रेकर, विराज कोरगावकर, हवालदार सुशांत चोपडेकर, कॉन्स्टेबल प्रकाश पोळेकर, आनंद राठोड, प्राजक्ता झालबा या पथकाने ही कामगिरी केली.