चतुर्थीला आरक्षण फुल्ल; एक्स्प्रेसची तिकिटे मिळेना, यंदा कोकण रेल्वेवर २४८ विशेष सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 12:53 PM2023-07-28T12:53:19+5:302023-07-28T12:55:31+5:30
संख्या वाढविली गेली असली तरी या गाड्यांचेही आतापर्यंत ६० टक्के आरक्षण फुल्ल झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : चतुर्थी हा गोव्यातील एक प्रमुख सण. नोकरी, उद्योग- व्यवसायानिमित्त परगावी असलेले गोमंतकीय चतुर्थीला आपल्या मूळगावी परत येतात. गणेश चतुर्थीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर तब्बल २४८ खास रेल्वे गाड्या धावणार आहेत. गाड्यांची संख्या वाढविली गेली असली तरी या गाड्यांचेही आतापर्यंत ६० टक्के आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे मोठा ताण या रेल्वेवर पडणार आहे. तसेच प्रवाशांनाही वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
सर्वाधिक गर्दी मुंबई मार्गावर
मुंबई मार्गावर सर्वाधिक गर्दी असते. मुंबईला अनेक गोमंतकीय कामानिमित्त स्थायिक झाले आहेत. ते चतुर्थीला आपल्या मूळगावी परत येणार आहेत, अशी माहिती मिळाली.
आरक्षण सुरु होताच काही मिनिटांत फुल्ल
आरक्षण सुरु होताच काही मिनिटात फुल्ल होत आहे. चतुर्थीला गावात जाणायांची संख्या जास्त असते, खास रेल्वेही सुरू करण्यात आल्या आहेत. तरीही तिकिटे मिळत नाहीत.
या गाड्यांची तिकिटे मिळेना
मुंबईला जाणाऱ्या कोकण कन्या, मांडवी एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांची तिकिटे फुल्ल झाली आहेत. या गाड्यांना प्रवासी नेहमीच जास्त पसंती देतात.
रेल्वेची तिकिटे फुल्ल आहेत. रेल्वेने स्पेशल ट्रेन घातल्या आहेत. त्या गाड्यांचेही आरक्षण फुल्ल आहे. जादा रेल्वे चतुर्थीच्या काळात या मार्गावर सुरु कराव्यात. - अनंत शिंदे, मडगाव.
आम्ही चतुर्थीला गावी जाणार आहोत. रेल्वेने स्पेशल गाड़या सुरु केल्याने रेल्वे प्रशासनाचे आम्ही आभारी आहोत. आरक्षण फुल्ल आहेत. आणखीन रेल्वे सुरु कराव्यात. -मोहित पाटील, मडगाव.
चतुर्थीला लोक मोठ्या संख्येने गावी येत असतात, या भाविकांना आपल्या गावी परत येण्यात कुठलीही अडचण भासू नये, यासाठी खास रेल्वेही सुरु करण्यात आल्या आहेत. - बबन घाटगे, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे