जुवारीच्या जमिनीवर रहिवासी प्रकल्प उभा राहाणार नाही; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2024 10:37 AM2024-08-03T10:37:52+5:302024-08-03T10:38:56+5:30
सरकार चौकशी करून योग्य कारवाई करेल
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सांकवाळ येथील जुवारी कंपनीच्या नावे असलेली जमीन रहिवासी प्रकल्पांसाठी दिली जाणार नाही. याप्रकरणी चौकशी केली जाईल. जर या प्रकल्पाला परवाने जारी झाले असतील, तर ते रद्द केले जातील, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिला.
आमदार विजय सरदेसाई यांनी जुवारी कंपनीने एका बांधकाम व्यावसायिक कंपनीला जमिनी विकल्या आहेत. या जागेत आता मोठे रहिवासी प्रकल्प येत असून, ते लाखो चौरस मीटर रुपयांनी विकले जात आहेत. या सर्व गोष्टींची सरकारला कल्पना आहे का? उद्योगासाठी असलेली जमीन रहिवासी प्रकल्पासाठी कशी दिली जाते? असा प्रश्न केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.
आमदार सरदेसाई म्हणाले, गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी जुवारी उद्योगाला ही जमीन २५ पैसे प्रति चौरस मीटर या दराने उद्योग स्थापन करण्यासाठी दिली होती. जेणेकरून गोव्याच्या लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा. जुवारी अॅग्रो केमिकल्स लिमिटेड व जुवारी इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नावे या जमिनी आहेत. मात्र, आता याठिकाणी बिल्डर असलेला अभिनंदन लोढा यांचा रहिवासी प्रकल्प येत असल्याचे त्यांनी सांगितले.
परवानगी रद्द करू
मुख्यमंत्री म्हणाले की, जुवारीची जागा ही उद्योगांसाठी आहे. जर त्याठिकाणी रहिवासी प्रकल्प येत असेल, तर त्याची कसून चौकशी केली जाईल. असा कुठलाही प्रकल्प तिथे होणार नाही. जर पूर्वपरवानगी दिली असेल, तर ती रद्द केली जाईल, त्यांनी सांगितले.
सरदेसाई म्हणाले...
जुवारीकडे असलेल्या त्या जागेत अनेक फ्लॅट्स व प्लॉट्स आहेत. फ्लॅटचा दर हा प्रति चौरस मीटर ५५ हजार रुपये, तर प्लॉट्स हे प्रति चौरस मीटर १.१९ लाख रुपये या दराने विकले जात आहेत. सर्वसामान्य गोमंतकीयांना येथे घर घेणे शक्यच नाही. नोंदल तसेच अन्य काही सरकारी यंत्रणेने या प्रकल्पासाठी परवानगीही दिली आहे. उद्योगासाठी असलेल्या जागेत रहिवासी प्रकल्प कसा, हा एक प्रकारचा घोटाळाच असल्याचा आरोप त्यांनी केला.