यापुढे परप्रांतीयांना नळजोडणी न देण्याचा ग्रामसभेत ठराव; बेतोड्यात म्हादईप्रश्नी हातोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 06:03 PM2023-02-06T18:03:45+5:302023-02-06T18:05:40+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'म्हादई' बचावचा ठराव.
फोंडाः म्हादई ही गोव्याची जीवनदायीनी आहे. येथे कर्नाटकमधील लोक मोठ्या संख्येने वास्तव्य करून आहेत. तरीसुद्धा कर्नाटक सरकारने हेकेखोरपणा करून म्हादई नदीचे पाणी वळविण्यासाठी जी भूमिका घेतली, त्याचा निषेध बेतोडा ग्रामसभेत करण्यात आला. गोमंतकीय लोकांची मागणी डावलून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकात जाऊन केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. भविष्यात पंचायत क्षेत्रात परप्रांतीय लोकांना नवीन नळजोडणी न देण्याचा ठराव बेतोडा पंचायतीच्या रविवारी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला.
सरपंच उमेश गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत आधीच्या पंचायत मंडळाने एका नवीन मद्य दुकानासाठी दिलेला ना हरकत दाखला मागे घेण्याच्या विषयावरून गोंधळ झाला. दाखला मागे घेण्याचा ठराव झाल्यानंतरच ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. सभेत म्हादई आणि मद्य दुकानाच्या विषयावरून ग्रामस्थ आणि पंचायत सचिवांची जोरदार खडाजंगी उडाली.
सभेत म्हादईचा विषय चर्चेस घेण्यात आला. या नदीमुळे राज्यातील बहुसंख्य जनतेला पाणी मिळते. आता पाणी वळविल्यास त्याचा परिणाम दूधसागर नदीवरही होणार आहे. ओपा प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या लोकांना त्याचा फटका बसणार आहे. भविष्यात पाणीटंचाई निर्माण होईल. म्हादई नदीप्रश्नी तोडगा निघेपर्यंत बेतोडा पंचायत क्षेत्रातील परप्रांतीय लोकांना स्थानिक पंचायतीने नळ जोडणीसाठी ना हरकत दाखला देऊ नये असा ठराव मंजूर करण्यात आला.
दरम्यान, आधीच्या पंचायत मंडळाने कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वी मनकटेमळ निरंकाल येथे एका नवीन मद्याच्या दुकानाला ना हरकत दाखला दिला. गावात मद्यविक्री दुकान सुरू करण्यास ग्रामस्थांनी विरोध केला होता. ६०-७० ग्रामस्थांनी सह्या घेऊन विविध खात्यांना निवेदने दिली. या प्रश्नावर ग्रामसभेत चर्चा झाली. दारूचे दुकान सुरू करण्यासाठी फक्त ७ जणांच्या सह्या घेतल्याचे ग्रामस्थांनी सरपंच उमेश गावडे यांच्या निदर्शनास आणून दिले. परंतु ग्रामसभेस उपस्थित काही लोकांनी हात उंचावून ठराव घ्या अशी मागणी केल्याने दारू दुकानाला विरोध करणारे ग्रामस्थ आक्रमक बनले. अखेर सरपंच उमेश गावडे यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत ना हरकत दाखला मागे घेण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर केला. पंचायत सचिव विनोद शेटकर, उपसरपंच चित्रा सालेलकर, पंच दुर्गाप्रसाद वैद्य, मधू खांडेपारकर, चंद्रकांत सामंत व अन्य पंच सदस्य उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'म्हादई' बचावचा ठराव
वर्धा : येथे भरलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी, समारोपाच्या सत्रात गोव्याची जीवनदायिनी म्हादईसंदर्भात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष तथा गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वसकर यांनी ठराव मांडला. गो.सा.से. मंडळाचे कोषाध्यक्ष राजमोहन शेट्ये यांनी त्याला अनुमोदन दिले. ठरावाचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले.
"लढ्याचे बळ वाढले"
वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गोव्याची जीवनदायिनी म्हादई संदर्भात संमत केलेल्या ठरावाचे गोवा सरकारच्यावतीने आम्ही स्वागत करतो. अखिल भारतीय स्तरावर दिग्गज मराठी साहित्यिकांच्या वतीने पारित झालेल्या या ठरावामुळे म्हादईसाठी सुरु असलेल्या लढ्यात आमचे बळ वाढले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या ठरावावर दिली.
"अभ्यासापूर्वीच डीपीआरला मंजुरी का?"
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या म्हणण्यानुसार जर म्हादईचे पाणी वळवण्यावर वैज्ञानिक अहवालाचा अभ्यास झालाच नसेल, तर कळसा-भांडुरा प्रकल्पाला पर्यावरण मंजुरी कशी मिळाली? आणि वैज्ञानिक अहवालाचा अभ्यास न करताच डीपीआर मंजूर झाला का? असा सवाल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.
मुरगाव बंदरातून होणार कर्नाटकची खनिज निर्यात
दरम्यान, कर्नाटक राज्य लोहखनिज निर्यात करण्यासाठी मुरगाव बंदराचा वापर करणार आहे. बंदरासाठी हा एक नवीन उपक्रम आहे आणि बंदराच्या नफ्यात एक किंवा दोन दशलक्षची भर पडण्याची शक्यता आहे, असे मुरगाव बंदर प्राधिकरणाचे (एमपीए) अध्यक्ष जी. पी. राय यांनी सांगितले. हे राज्यासाठी फायदेशीर आहे, असे ते म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"