संस्कृत भाषा घरोघरी पोहोचविण्याचा संकल्प; अडीच हजार विद्यार्थ्यांनी एकत्र सादर केले गीतेतील अध्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 11:09 AM2023-12-03T11:09:04+5:302023-12-03T11:10:15+5:30
संस्कृत भारती गोवातर्फे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली: देववाणी व सर्व भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेला घरोघरी पोहोचविण्यासाठी शाळांमध्ये प्राथमिक स्तरापासून मुलांना रुची निर्माण व्हावी, यासाठी प्रत्येक शाळेत एक संस्कृत शिक्षक नियुक्त केला जात आहे. भाषा संचालनालय सर्व भाषांप्रमाणे संस्कृतला प्रोत्साहन देताना शैक्षणिक तसेच इतर उपक्रमांसाठीही भरीव सहकार्य करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
संस्कृत भारती, गोवातर्फे 'गीतामृतम्' हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डिचोली तालुक्यातील विविध हायस्कूलमधील सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांकडून भगवद्गीतेतील बाराव्या व पंधराव्या अध्यायाचे पठण करण्यात आले. हा ऐतिहासिक सोहळा साखळीतील नगरपालिका मैदानावर संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, रिवण येथील श्री विद्यापाठशालाच्या आचार्य अपर्णा देवदत्त पाटील, साखळीतील कार्यकर्ते, संस्कृत भारतीचे अध्यक्ष आनंद देसाई, राजभाषा संचालनालयाचे उपसंचालक अनिल सावंत, स्वागताध्यक्ष शिवानंद खेडेकर, प्रसाद उमर्ये, नगराध्यक्षा रश्मी देसाई, गोपाळ सूर्लकर उपस्थित होते.
यावेळी अनिल सावंत यांनी मार्गदर्शन केले, प्रमुख वक्त्या अपर्णा देवदत्त पाटील यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. चार दशके संस्कृत भारतीचे कार्य गोव्यात चालू आहे. गीता हा ज्ञानाचा ग्रंथ सर्व शाळांपर्यंत पोहोचवावा. हे कार्य सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून पुढील जीवनात त्यांना उपयोगी पडणार आहे. यासाठी त्यांना शिकविण्यात आले. प्रत्येक शाळेतील पाच मुलांनी प्रातिनिधीक स्वरूपात मंचावर येऊन पठण केले व इतर मुलांनी समोर बसून पठण केले.
प्रसाद उमर्ये यांनी गीतेच्या माध्यमातून संस्कृतीची गोडी लागावी व जीवनाचा मंत्र मिळावा, या उद्देशाने कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. संस्कृत गोवाभर पसरावे व पुढील कार्यकाळांमध्ये सर्व शाळांमध्ये संस्कृत शिकवावे, असे यावेळी प्रसाद उमर्ये यांनी सांगितले.
प्राथमिक स्तरापासून मान्यता दिली
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी देवांची, वेदांची भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत भाषेला पुढे नेण्यासाठी मोदी सरकारने अनेक उपक्रम सुरू करून प्राथमिक स्तरापासून तिला मान्यता दिली. त्यामुळे आज देशभरातील लाखो शाळांतील विद्यार्थी ती शिकत असून, त्यातून मानवी जीवन समृद्ध करण्याची शक्ती निर्माण होणार आहे. गोव्यात या भाषेचे चांगले कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.