राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रदर्शनाला जगभरातील चाहत्यांचा प्रतिसाद; माजीद माजिदी, ए. आर. रेहमान यांच्याकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 12:57 AM2017-11-26T00:57:20+5:302017-11-26T00:57:33+5:30
गोव्यात सुरु असलेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये भारत सरकारच्या राष्टीय चित्रपट संग्रहालयामार्फत भरविण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनीचे महोत्सवात दाखल झालेल्या जगभरातील प्रतिनिधींनी कौतुक केले.
- संदीप आडनाईक
पणजी : गोव्यात सुरु असलेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये भारत सरकारच्या राष्टीय चित्रपट संग्रहालयामार्फत भरविण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनीचे महोत्सवात दाखल झालेल्या जगभरातील प्रतिनिधींनी कौतुक केले.
भारतीय चित्रपटसृष्टीला योगदान देणाºया महिला कलाकारांचा सन्मान करण्यासघटी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामार्फत हे पोस्टर प्रदर्शन येथील कला अकादमी परिसरात भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते करण्यात आले होते.
स्त्री : अ ट्रिब्यूट टू वूमनहूड इन इंडियन सिनेमा, असे या प्रदर्शनाला नाव देण्यात आले असून या प्रदर्शनामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील भारतीय महिला कलावंतांचे जीवन आणि त्यांच्याशी संबंधित संघर्षाचा प्रवास मांडण्यात आला आहे. या प्रदर्शनात भारतीय महिला चित्रपट कलावंत आणि निर्मात्यांच्या योगदानाचा आलेख मांडण्यात आला आहे. प्रदर्शनात हिंदी चित्रपटांच्या सुरुवातीच्या कालखंडातील मीराबाई या चित्रपटाच्या पोस्टरपासून आताच्या चक दे इंडियाचे पोस्टरचा समावेश आहे.
माजिद माजीदी प्रभावित
चिल्ड्रन्स आॅफ हेवन्स या गाजलेल्या चित्रपटाचे इराणी दिग्दर्शक माजिद माजिदी यांनी या संग्रहालयाला भेट दिली. त्यांच्यासोबत आॅस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमानही होते. माजिद माजिदी यांनी या प्रदर्शनीचे कौतुक करत भारतीय चित्रपटांचा इतिहास आणि वारसा जतन करण्याचे काम संग्रहालय करत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. माजिदी यांनी साहब, बीवी और गुलाम, सुजाता, मदर इंडिया, प्यासा यासारखे महिलाकेंद्रीत चित्रपट पाहिल्याची आठवण सांगितली.
रेहमान झाले सद्गदित
प्रदर्शनात १९५३ चा अवैय्यार या तमिळ चित्रपटाचे पोस्टर पाहून या चित्रपटाला संगीत देणाºया ए. आर. रेहमान यांना आपल्या आठवणींना आवर घालता आला नाही. हे पोस्टर पाहून ते सद्गदित झाले. आयोजकांकडे त्यांनी या पोस्टरची प्रत आवर्जुन मागवून घेतली. या चित्रपटातील गाण्यांनी इतिहास रचला होता, असे रेहमान यांनी सांगितले.
राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय भारतीय चित्रपटांचा इतिहास आणि वारसा जपण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक जुन्या भारतीय क्लासिक चित्रपटांचा संग्रह संस्थेकडे आहे आणि तो जपण्यात येत आहे.
- प्रकाश मगदूम.
संचालक, चित्रपट संग्रहालय