Coronavirus : गोव्यात रेस्टॉरंट्स, मंदिरे, चर्चेस सोमवारपासून खुली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 07:39 PM2020-06-05T19:39:36+5:302020-06-05T19:40:29+5:30
रेस्टॉरंट्स खुली केल्यानंतर कोणते नियम लागू होतील हे सरकार घोषित करील.
पणजी : राज्यातील रेस्टॉरंट्स येत्या सोमवारपासून खुली होतील. त्यासाठीची निश्चित प्रक्रिया (एसओपी) सरकार जाहीर करील. सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागेल. मंदिरे व चर्चेस देखील खुली करण्यास हरकत नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले. रेस्टॉरंट्स खुली केल्यानंतर कोणते नियम लागू होतील हे सरकार घोषित करील.
सोशल डिस्टन्सिंगची अट प्रमुख असेल. मंदिरे व चर्चेस खुली करण्यास आक्षेप नाही. फक्त तिथे कोणते सोहळे आयोजित केले जाऊ नयेत. तिथे लोकांनी जमू नये. मंदिरात रोजची पूजा करण्यापुरतेच मंदिर उघडायला हवे. तिथे आरत्या वगैरे विधी करता येणार नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
खर्च कपातीचे अनेक उपाय
सरकारने मंत्री, आमदार व इतरांसाठी खर्च कपातीचे अनेक मोठे उपाय सुरू केले आहेत. येत्या बुधवारी आम्ही ते जाहीर करणार आहोत. आमदारांना फक्त दोन टक्के व्याजाने अगोदर घर बांधणीसाठी कर्ज मिळत होते. या कर्जासाठी आता बँकांसारखा व्याजदर लागू होईल. सर्व मंत्री, आमदारांनी एक वर्षासाठी आपले 30 टक्के वेतन कोरोना निधीसाठी दिले आहे. सरकारी खर्च नियंत्रित केला जात आहे. संबंधित समितीने त्यासाठीचा अहवाल सादर केला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकारचा जीएसटी व अन्य महसूल 8० टक्क्यांनी कमी झाला आहे. वाणिज्य कर खात्याने वादग्रस्त कर दावे निकालात काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सहा वर्षे दावे प्रलंबित होते. सरकारने त्यासाठी योजना तयार केली. व्यापा-यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.