सरकारी अधिकाऱ्यांवरील निर्बंध शिथिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 02:14 AM2017-07-20T02:14:58+5:302017-07-20T02:14:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : आमदारांच्या कार्यालयात सार्वजनिक कामानिमित्त किंवा बैठकीसाठी जाण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना मुभा देणारा दुरुस्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : आमदारांच्या कार्यालयात सार्वजनिक कामानिमित्त किंवा बैठकीसाठी जाण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना मुभा देणारा दुरुस्ती आदेश सरकार जारी करणार आहे. यापूर्वी जारी केलेल्या परिपत्रकात त्याबाबतची दुरुस्ती केली जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले व विरोधी आमदारांचे समाधान झाले.
विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. अधिकाऱ्यांना आमदारांच्या घरी किंवा कार्यालयात जाण्यापासून मनाई करणारे परिपत्रक जारी केल्यामुळे कोणत्या अडचणी येत आहेत ते कवळेकर यांनी सांगितले. उत्तरादाखल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ते परिपत्रक दुरुस्त केले जाईल. आमदार व खासदारांच्या अधिकृत कार्यालयात अधिकाऱ्यांना जाता येईल, घरी नव्हे, असे मुख्यमंत्री म्हणाले. अधिकाऱ्यांवर कामाचा ताण, जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. वारंवार आमदारांनी त्यांना बोलावू नये एवढेच अपेक्षित आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बुधवारी विधानसभा अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेते व अन्य आमदारांसोबत बैठक घेतली व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. परिपत्रक दुरुस्त करावे, असे त्या वेळीच ठरले.