पीएमसी बँकेवरील निर्बंधामुळे म्हापसा अर्बनच्या विलीनीकरणाला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 01:18 PM2019-09-24T13:18:19+5:302019-09-24T13:34:05+5:30
PMC Bank Update: रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या आर्थिक निर्बंधामुळे बिकट परिस्थितीतून वाटचाल करणाऱ्या म्हापसा अर्बन बँक ऑफ गोवाच्या विलीनीकरणाला मोठा धक्का बसला आहे.
म्हापसा - रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या आर्थिक निर्बंधामुळे बिकट परिस्थितीतून वाटचाल करणाऱ्या म्हापसा अर्बन बँक ऑफ गोवाच्या विलीनीकरणाला मोठा धक्का बसला आहे. रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर लागू केलेले आर्थिक निर्बंध धक्क्याचे कारण ठरले आहे. विलीनीकरणावर म्हापसा अर्बनच्या आमसभेत तीन दिवसापूर्वी ठराव मंजूर करण्यात आला.
बँकिंग रेग्युलेशन अॅक्टमधील नियम ३५ अंतर्गत ज्या पद्धतीने सुमारे साडेचार वर्षा पूर्वी म्हापसा अर्बवर आर्थिक निर्बंध लागू करण्यात आले होते त्याच पद्धतीने पीएमसीवर सुद्धा आर्थिक अनियमिततेचे कारण देत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. म्हापसा अर्बनातील खातेधारकांना आपल्या खात्यावरून फक्त 1 हजार रुपया काढण्याची मुभा देण्यात आलेली. त्यानंतर हे निर्बंध काही अंशी शिथील करण्यात आले होते.
विलीनीकरणावर निर्णय घेण्यासाठी म्हापसा अर्बनची शनिवारी विशेष आमसभा संपन्न झाली होती. यात सहकार क्षेत्रातील तीन बँका पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँक (पीएमसी), डोंबिवली नागरी सहकारी बँक तसेच ठाणे जनता सहकारी बँक (टीजेएसबी) यात विलीनीकरण करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आलेला. घेतलेल्या निर्णयाची माहिती म्हापसा अर्बने सोमवारी राज्य सहकार निबंधकाना सादर करण्यात आलेली. पीएमसीसोबत विलीनीकरणाची चर्चा करण्यापूर्वी डोंबिवली नागरी सहकारी बँकेसोबत सुद्धा चर्चा केली होती. त्यामुळे आता टीजेएसबी या पर्याय राहिला आहे.
विलीनीकरणाची प्रक्रिया १५ दिवसाच्या आत पूर्ण करण्याच्या हेतूने म्हापसा अर्बनकडून हालचाली सुरू करण्यात आलेल्या. अंतिम टप्प्यात आलेली ही चर्चा पूर्णत्वाकडे नेण्यासाठी फक्त म्हापसा अर्बनच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून तोडगा काढणे बाकी होते. सुमारे साडेचार वर्षा पूर्वी म्हापसा अर्बनवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधात अनेकवेळा वाढ करण्यात आली आहे. देण्यात आलेली तीन महिन्याची अंतिम मुदत वाढ १८ नोव्हेंबरला संपुष्टात येत असून त्यापूर्वी विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा रिझर्व्ह बँकेने म्हापसा अर्बनला दिला होता.
म्हापसा अर्बनप्रमाणे पीएमसीवर सुद्धा निर्बंध लागू केले असल्याने विलीनीकरणावर सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम लागणार आहे. त्यामुळे विशेष बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार डोंबिवली नागरी सहकारी बँक किंवा ठाणे जनता सहकारी बँकेसोबत विलीनीकरणाची चर्चा म्हापसा अर्बनला सुरू करावी लागणार आहे. या संबंधी म्हापसा अर्बनचे अध्यक्ष डॉ. गुरूदास नाटेकर यांना विचारले असता पीएमसी सोबत सुरु असलेली चर्चा पुढे नेण्यास अर्थ नसल्याने घेतलेल्या ठरावानुसार इतर दोन बँकासोबत चर्चा सुरु केली जाणार असल्याचे सांगितले.